Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: November 25, 2022 03:46 PM2022-11-25T15:46:13+5:302022-11-25T15:46:55+5:30

Bhediya Movie Review : जाणून घ्या कसा आहे, वरूण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' चित्रपट

Bhediya Movie Review : Thinking of watching Varun Dhawan and Kriti Sanon's Bhediya, then read this review first | Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू

Bhediya Movie Review : वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा 'भेडिया' पाहायचा विचार करताय, मग आधी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : वरुण धवन, क्रिती सॅनोन, अभिषेक बॅनर्जी, दीपक डोब्रियाल, पालीन कबक, शरद केळकर
दिग्दर्शक : अमर कौशिक
निर्माते : दिनेश विजान
शैली : हॉरर कॅामेडी
कालावधी : दोन तास ३६ मिनिटे
स्टारः तीन स्टार
चित्रपट परीक्षणः संजय घावरे

निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण आपण जे निसर्गाला देतो त्याची परतफेड तो दुपटीनं करत असतो. वनसंपदा अनमोल आहे, तिचं जतन करायला हवं. जंगलांची कत्तल करून झालेला विकास एक दिवस मानवजातीच्या मूळावर येईल हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण आता खरोखर कृती करण्याची गरज आहे. हेच या चित्रपटातून ठासून सांगण्यात आलं आहे. 'जो जंगल कापणार त्याला विषाणू चावणार', हा संदेश दिग्दर्शक अमर कौशिक यांनी या चित्रपटाद्वारे दिला आहे. भक्षकच जेव्हा नकळत रक्षक बनतो तेव्हा काय होतं त्याची कथा यात आहे.

कथानक : लहान-सहान कॅान्ट्रॅक्ट घेणाऱ्या भास्कर शर्माची ही कथा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जंगलातून रस्ता काढण्यासाठी गावकऱ्यांकडून जमिन अधिग्रहित करण्याचं कॅान्ट्रॅक्ट भास्करला मिळतं. त्यासाठी तो वडीलोपार्जित घरही गहाण टाकतो. चुलत भावासोबत हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचतो. एका वळणावर एक लांडगा भास्करच्या मागे लागतो. भास्कर झाडाला लटकतो, पण लांडगा त्याच्या पार्श्वभागाचा लचका तोडतो. उपचारांसाठी भास्करला जनावरांची डॉक्टर असलेल्या अनिकाकडे आणलं जातं. ती उपचार करते आणि दुसऱ्या दिवशी भास्करची जखम बरी होते. गावकऱ्यांची मिटींग घेऊन भास्कर रस्त्याचं प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवतो, पण गावकरी भडकतात. भास्कर तरुणांच्या लीडरशी हातमिळवणी करून त्यांच्या सह्या घेतो. त्यानंतर अशा काही घटना घडत जातात ज्या आकलना पलीकडल्या असतात.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन चांगली असून, निसर्गसंवर्धनाचा संदेशही सुरेख आहे. चित्रपटातील काही संवाद खूप मार्मिक आहेत. सुरू झाल्यापासून चित्रपट काहीशा संथ गतीने पुढे सरकतो. एका तरुणाचा लांडगा होणं हा खरं तर कल्पनाविस्तार आहे, पण जंगल वाचवण्यासाठी लढवलेली ही शक्कल चित्रपट ठराविक अंतरापर्यंत जाईस्तोवर पचनीही पडते, पण ८५ टक्के चित्रपट झाल्यावर एक टर्निंग पॅाईंट समोर येतो, जो सर्वांवर पाणी ओतण्याचं काम करतो. त्यानंतर चित्रपट पाहणं केवळ औपचारीकता बनतं. व्हीएफएक्स चांगले आहेत. जिष्णू भट्टाचार्जी यांनी सुरेख कॅमेरावर्कद्वारे हिमाचल प्रदेशमधील निसर्गसौंदर्य आणखी खुलवलं आहे. कला दिग्दर्शनही चांगलं आहे. चित्रपटाची लांबी आणखी कमी करायला हवी होती. 'बाकी सब ठीक है...' हे गाणं चांगलं असलं तरी त्याची खरंच गरज होती का हा प्रश्न पडतो. इतर गाणीही चांगली आहेत. पार्श्वसंगीत आणि कॉश्च्युमही छान आहेत. क्लायमॅक्सपूर्वी दिलेलं स्पष्टीकरण पटत नाही. वरुणचं कोल्ह्यात रूपांतर करण्याची दृश्ये चांगली झाली आहेत.

अभिनय : भास्करसाठी वरुणनं घेतलेली मेहनत पडद्यावर जाणवते. आजवर कधीही न पाहिलेलं वरुणचं रूप आणि त्याला साजेसा अभिनय यात आहे. क्रिती सनॉनची भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची आहे. एका गावातील डॉक्टरला इतका मॉडर्न गेटअप देण्यामागील कारण स्पष्ट होत नाही. अभिषेक बॅनर्जीच्या वाट्याला खूप चांगला रोल आला असून, त्याचे डायलॅाग्ज प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आहेत. पांडाच्या भूमिकेत दीपक डोब्रियालानंही जबरदस्त काम केलं आहे. अखेरच्या दृश्यांमध्ये राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना यांना पाहणे रसिकांसाठी सरप्राईज पॅकेज आहे.

सकारात्मक बाजू : सशक्त संदेश, अभिनय, दिग्दर्शन, व्हिएफएक्स, कॅमेरावर्क, निसर्गसौंदर्य, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : चित्रपटाची संथ गती, लांबी, क्लायमॅक्समध्ये उलगडलेले मुद्दे
थोडक्यात : बऱ्याच वर्षांनी मानव आणि प्राणी यांची सांगड घालणारं कथानक मोठ्या पडद्यावर आले आहे. काही त्रुटी राहिल्या असल्या तरी एकदा हा चित्रपट पहायला हवा.

Web Title: Bhediya Movie Review : Thinking of watching Varun Dhawan and Kriti Sanon's Bhediya, then read this review first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.