Join us

भारताने T20 WC जिंकताच बिग बींचे डोळे पाणावले; म्हणतात - "भारत माता की जय..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:18 PM

अमिताभ बच्चन यांनी भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्यात (T20)

काल भारताने T 20 वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये मात करत भारताने T 20 वर्ल्डकप खिशात घातला. काही महिन्यांपूर्वी वन डे वर्ल्डकप भारताला जिंकता आला नव्हता. त्यामुळे भारतीयांचं सर्व लक्ष टीम इंडिया T 20 वर्ल्डकपमध्ये बाजी मारतो का, यावर होतं. अखेर सर्व भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करत T 20 वर्ल्डकप भारताने जिंकला. याविषयी अमिताभ बच्चन यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत  आहे.

T 20 वर्ल्डकप जिंकल्यावर अमिताभ टीम इंडियाविषयी काय म्हणाले?

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर याविषयी लिहिलंय की, "T 5057- डोळ्यातलं पाणी थांबत नाहीय... डोळ्यांतल्या अश्रूंंनी टीम इंडिया भिजली आहे... वर्ल्ड चॅम्पियन भारत, भारत माता की जय, जय हिंद, जय हिंद, जय हिंद."

यासोबतच बिग बिंनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलंय की, "उत्साह, भावना आणि भीती सर्वकाही झालं आणि संपलं. आज टीव्ही पाहिला गेला नाही. जेव्हा मी टीव्ही पाहतो तेव्हा आपला पराभव होतो. सध्या बाकी काही मनात येत नाही... टीम इंडियाच्या डोळ्यातलं पाणी बघून माझेही डोळे पाणावले आहेत." अमिताभ यांनी याआधीही अनेकदा सांगितले आहे की, जेव्हा ते सामना पाहतात तेव्हा इंडिया हरते. यामुळे त्यांनी यावेळीही टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला नाही.

भारताने T 20 वर्ल्डकपवर कोरलं नाव

भारताच्या क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. 

टॅग्स :अमिताभ बच्चनट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024टी-20 क्रिकेटरोहित शर्मा