लावणीसम्राज्ञी असं बिरुद मिरवणाऱ्या लावणी कलावंत म्हणजे सुरेखा पुणेकर (surekha punekar). आपल्या अदाकारीने त्यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे सुरेखा पुणेकर यांचं नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. उत्तम कलावंत असलेल्या सुरेखा 'बिग बॉस 2' (bigg boss marathi 2) मध्ये सहभागी झाल्या होत्या. या शोच्या निमित्ताने त्यांनी अभिनेता, सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शोचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरेखा पुणेकर यांना विमानतळावर त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाचं कथन त्यांनी केलं आहे.
सध्या चर्चेत येत असलेला व्हिडीओ दोन स्पेशल या कार्यक्रमातील असून जितेंद्र जोशी यांनी सुरेखा पुणेकर यांची छोटेखानी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी विमानतळावर त्यांना लावणी सादर करावी लागली असं सांगितलं.
" मराठी मंडळाचं अमेरिकेत अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. २००१ पासून या कार्यक्रमासाठी मला सतत बोलवणं येत होतं. त्यामुळे २००३ मध्ये मी या कार्यक्रमासाठी अमेरिकेत जाण्याचं ठरवलं. त्यावेळी व्हिसा काढण्यासाठी मी कॉन्सिलिएटमध्ये गेले. तेव्हा माझ्यासोबत सुधीर भट होते. मी व्हिसा घेण्यासाठी कॉन्सिलिएटमध्ये गेले. तर तेथील लोकांनी मला ओळखलंच नाही. मी साध्या वेशात गेले होते. मेकअप वगैरे काहीच केला नव्हता," असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "कॉन्सिलिएटमध्ये गेल्यावर तुम्ही कोण? असा प्रश्न मला विचारण्यात आला. त्यावर मी माझं नाव सुरेखा पुणेकर असून अमेरिकेत लावणी सादर करायला चालले असं सांगितलं. त्यावर तुम्ही सुरेखा पुणेकर नाहीच असं तेथील अधिकारी म्हणाले. इतकंच नाही तर, मी सुरेखा पुणेकर यांना स्वत: पाहिलं आहे. त्यांची या रावजी बसा भावजी ही लावणी ऐकली आहे. त्यांचं सादरीकरण पाहिलं आहे. त्या अशा दिसत नाहीत", असंही म्हणाले.
दरम्यान, "माझी ओळख पटवून देण्यासाठी मी कॉन्सिलिएटमध्ये या रावजी बसा भावजी या लावणीचं एक कडवं गायलं आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून मला व्हिसा दिला" असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या. या कार्यक्रमात यांच्यासोबत अभिजीत बिचुकलेदेखील सहभागी झाले होते.