मुंबई - बहुचर्चित ठरलेल्या 'बिग बॉस मराठी ३' ला यंदा जल्लोषात सुरुवात झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे बिग बॉसच्या घरात कुणालाच एंट्री मिळाली नव्हती. त्यामुळे, यंदाच्या बिग बॉस ३ मध्ये कोणत्या नवख्या चेहऱ्यांना संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. या सिझनमध्ये भूमाता ब्रिगेडच्या आक्रमक अध्यक्षा तृप्ती देसाई यांची एंट्री झाली आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांनीही दमदार प्रवेश केला आहे.
बिग बॉस मराठीच्या या पर्वात कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे सहभागी झाले आहेत. याच कलाकारांच्या यादीमध्ये आता शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचा गजर ऐकायला मिळणार आहे. वादग्रस्त असलेल्या या शोमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येईल. संत-साहित्य परंपरांचा गाढा अभ्यास असलेल्या शिवलीला पाटील यांची एंट्रीही तशीच भावूक आणि भक्तीमय वातावरण निर्माण करणारी झाली. शिवलीला पाटील या मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या कन्या आहेत. त्यामुळे, त्यांच्या बिग बॉस प्रवेशानंतर बार्शीकरांनी सोशल मीडियातून आनंद व्यक्त केला आहे.
शिवलीला यांनी बिग बॉसमध्ये एंट्री करताच महेश मांजरेकर यांच्याशी गप्पा मारल्या. दरम्यान, शिवलीला यांचे आई-वडील त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे नाव शिवलीला का ठेवले असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्या उत्तराने वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
म्हणून नाव ठेवलं शिवलीला
शिवलीला यांच्या आईने तो किस्सा सांगितला, लग्नानंतर जवळपास सात वर्षे त्यांना मुल झाले नव्हते. त्यामुळे, त्यांनी शिवलीला ग्रंथाचं १०८ वेळा पारायण केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडले. शिवलीला यांच्या आईने स्वप्नाबाबत त्यांच्या आईंना सांगितले. पण, आईंनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. जेव्हा, शिवलीला यांच्या आई डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी त्या गरोदर असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव शिवलीला ठेवले, अशी सत्यकथा त्यांनी सांगितली.
तृप्ती देसाई यांचाही बिग बॉसच्या घरात प्रवेश
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचीही एण्ट्री झाली आहे. 'मोडेन पण वाकणार नाही', असं म्हणत शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी घरातील सर्व स्पर्धकांना इशारा दिला आहे. 'बिग बॉस'च्या ग्रँड प्रिमियरमध्ये महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाईंना 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण विचारलं. त्यावर समाजात माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्या प्रतिमेच्या पलिकडे जाऊन मी एक व्यक्ती म्हणून कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी सहभागी झाले अशा आशयाचं उत्तर त्यांनी दिलं आहे.