मुंबई - अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशाच्या आयुष्यात अली नावाचा एक व्यक्ती आला होता. याच व्यक्तीसोबत तुनिशानं मृत्यूपूर्वी अखेरची १५ मिनिटं संवाद साधला होता. अलीसोबत तुनिशाची मैत्री तिच्या आईलाही माहिती होती असं कोर्टाच्या सुनावणीत पुढे आले आहे.
अभिनेता शिझान खानच्या वकिलांनी हा दावा केला आहे. वकिलांच्यानुसार, शिझानशी ब्रेकअपनंतर तुनिशाने डेटिंग ऐप टिंडर जॉईन केले होते. याठिकाणी अली नावाच्या मुलासोबत ती बोलत होती. अलीसोबत तुनिशा डेटवर गेली होती. मृत्यूच्या १५ मिनिटे आधी तुनिशाने अलीसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला होता. शिझान नव्हे तर अली अभिनेत्रीच्या संपर्कात होता असं त्यांनी कोर्टात म्हटलं.(Tunisha Sharma Suicide Case)
इतकेच नाही तर तुनिशाने तिच्या आयुष्यातील समस्येबाबत सहकलाकार आणि मित्र पार्थलाही सांगितले होते. तिने पार्थला रस्सीही दाखवली होती. ती सुसाईडबाबत विचार करतेय हे स्पष्ट दिसून येत होते. जेव्हा शिझान खानला हे कळाले तेव्हा त्याने तुनिशाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांना हा प्रकार सांगितला. तुनिशाची काळजी घेण्याबाबत शिझाननं कुटुंबाला कळवले होते असं वकिलांनी कोर्टात सांगितले.
छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'ची राजकुमारी मरियम म्हणजेच अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्या प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. तुनिशा शर्माची आई वनिता यांनी शिझान खानवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. यातच तुनिशाचा श्वास सुरु होता, ५ मिनिटांवर हॉस्पिटल होते, तिथे का नेले नाही, असा प्रश्न आईने उपस्थित केला आहे.
ती हत्या असू शकते...ती आत्महत्या किंवा हत्या असू शकते. कारण शिझान तिला दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलला घेऊन गेला होता. सेटपासून ५ मिनिटांच्या अंतरावरही हॉस्पिटल होते. मात्र, असे असतानाही तो तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाही? तिचा श्वास सुरू होता तिला वाचवता आले असते, असे वनिता शर्मा यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी, तुनिशा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. वनिता यांनी शिझानवर तुनिशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तुनिशाच्या आईने खुलासा केला की, ब्रेकअपच्या दिवशी शिझानने तुनिशाला थप्पड मारली होती.
शिझान खानच्या कुटुंबाने केला होता पलटवार तुनिशा मृत्यू प्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) हा अटकेत असून दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिझान खानच्या कुटुंबाने पत्रकार परिषद घेत तुनिशाच्या आईवरच गंभीर आरोप केले होते. तुनिशाचा एका भलत्याच मुलासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वत: त्या मुलानेच शेअर केला होता. गौरव भगत (Gaurav Bhagat) हा एक युट्युबर आहे. तो तुनिशाच्या खूपच जवळचा असल्याचं व्हिडिओतून दिसून येते. या दोघांमध्ये नक्की काय होतं असे प्रश्न उपस्थित केले गेले. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'तुनिशा तू नेहमी स्मरणात राहशील तू एक खूप छान मुलगी होतीस' असे कॅप्शन त्याने दिले होते.