प्रसार भारतीच्या मालकीच्या डायरेक्ट टू होम म्हणजेच डीटीएच प्लॅटफॉर्मवरून येत्या १ एप्रिलपासून चार मोठ्या कंपन्या त्यांचे चॅनल काढून घेणार आहेत. हे चॅनल मोफत दिले जात होते. डीडी फ्री डिशवरून हटविण्यात येणाऱ्या या चॅनलमध्ये स्टार उत्सव, झी अनमोल, कलर्स रिश्ते आणि सोनी पल यांचा समावेश आहे. आता हे चॅनल केबल, टाटा प्ले, एअरटेलसारख्या पेड डीटीएच प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध असणार आहेत.
कंपन्यांनी आता फायदा पाहण्यास सुरुवात केली आहे. नवीन टॅरिफ आदेश २.० लागू झाल्यानंतर पैसे देणारे ग्राहक मोफत चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास सुरुवात करतील अशी भीती या कंपन्यांना वाटू लागली आहे. यामुळे या कंपन्यांचा महसूल बुडेल. यामुळे डीडीच्या मोफत डीटीएचवर या कंपन्या देत असलेले चॅनल तिकडून काढून घेण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे.
याद्वारे कंपन्या त्यांचे प्रती ग्राहक महसूल वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा कंपन्यांनी मुद्दामहून घेतलेला निर्णय असून पुढे त्यांना याचा फायदा होणार आहे. असे केल्याने डीडीच्या डीटीएचवरील ग्राहकांना मनोरंजनासाठी तिथे काहीच उरणार नाही, यामुळे नवीन टॅरिफ आदेश २.० लागू झाला तरी देखील ग्राहकांना या कंपन्यांच्या पॅकेजकडे वळावे लागणार आहे, असा दावा सुत्रांनी केला आहे.
केबल आणि DTH प्लॅटफॉर्मकडून GEC सामग्री विनामूल्य दाखवल्याबद्दल प्रसारकांकडे सतत तक्रार होत होती. या चॅनलसाठी डीडी फ्री डिश ग्राहकांकडून सदस्यता शुल्क आकारत नाही. परंतू या केबल आणि अन्य डीटीएच कंपन्यांना ते पैसे मोजावे लागतात. यात समानता यावी अशी त्यांची मागणी आहे. डीटीएच ऑपरेटर्सचे असे मत आहे की हे चॅनेल एकतर पे किंवा प्लॅटफॉर्मवर एफटीए असावेत. पे प्लॅटफॉर्मवरून डीडी फ्री डिश कडे स्थलांतराचा स्टार, झी, सोनी आणि वायाकॉम 18 सारख्या पे टीव्ही ब्रॉडकास्टरवर गंभीर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.