‘बिग बॉस 12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची. होय, ही जोडी आहे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या तीन वर्षांपासून स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची खूप चांगली केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनूप जलोटा लवकरच या कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसच्या घरात एंट्री मारल्यापासूनच अनूप आणि जसलीन हे प्रेक्षकांचे लाडके जोडपे बनले आहे. पण अनूप जलोटा या महिन्यातच बिग बॉसचे घर सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. अनूप जलोटा कॅलिफोर्निया येथील एका कार्यक्रमात ऑक्टोबरमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा कार्यक्रम 27 तारखेला असल्याने 27 ऑक्टोबरच्या आत ते घराच्या बाहेर येणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अनूप जलोटा कार्यक्रमातून लवकर बाहेर पडू शकतात असा इशारा त्यांनी बिग बॉसच्या घरात जायच्या आधीच दिला होता. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, माझे कॉर्न्स्टस असल्याने मला बिग बॉसच्या मंडळींनी लवकर बाहेर जाऊन द्यावे. माझ्यामते मी महिनाभर तिथे असेल, तिथे असताना प्रत्येक दिवस एन्जॉय करायचा असे मी ठरवले आहे.
जसलीनने बिग बॉस 12 च्या घरात प्रवेश करताना सांगितले होते की, ती गेल्या तीन वर्षांपासून अनूप यांना डेट करतेय. इतकी वर्षे त्यांनी ही रिलेशनशिप जगाच्या नजरेपासून लपवून ठेवली होती. अनूप आणि जसलीन यांनी ही गोष्ट कबूल केली असली तरी प्रेक्षकांनाच नाही तर ‘बिग बॉस12’च्या स्पर्धकांनाही अनूप आणि जसलीन कपल असल्याची गोष्ट पचवता आलेली नाही.