बिग बॉस या कार्यक्रमाचा सध्या १२ वा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या सिझनला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाहीये. पण तरीही या सिझनमधील काही स्पर्धक प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. या कार्यक्रमात क्रिकेटर श्रीसंत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. श्रीसंत बिग बॉस १२ चा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. तो प्रचंड चलाखीने हा खेळ खेळत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. श्रीसंतने या कार्यक्रमाच्या दरम्यान नुकतीच त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगितली.
२००८ साली श्रीसंत आणि हरभजन यांच्यात मैदानावर झालेल्या भांडणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच घटनेविषयी श्रीसंतने नुकताच कार्यक्रमात खुलासा केला. बिग बॉसच्या कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान कार्यक्रमातील स्पर्धक सुरभी राणा पत्रकार बनली होती आणि प्रत्येक स्पर्धकांकडून काही ना काही ब्रेकिंग न्यूज काढण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी सुरभीने हरभजला या घटनेबद्दल विचारले असता त्यावर श्रीसंतने सांगितले, आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले पाहिजे असे मला वाटते. मला भरपूर लोकांची तोंडं बंद करायची आहेत हे अनेकांना माहीत आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचा मी यासाठीच वापर करणार आहे. आता या गोष्टीबद्दल बोलायचे असे मी ठरवले आहे. मला आजही आठवतंय २००८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात चंडीगडमध्ये मॅच झाली होती. मॅच संपल्यावर मी खूपच अग्रेसिव्ह झालो होतो ही गोष्ट मी मान्य करेन. त्यावेळी जे काही घडले ते सगळे काही व्हिडिओत दिसले नाही. मॅच संपल्यावर मी खेळाडूंशी हस्तांदोलन करायला गेलो तेव्हा मी हार्ड लक भज्जी असे हरभजनला बोललो. त्यावर त्याने त्याचा हात माझ्या गालावर ठेवला. त्याने माझ्या कानाखाली मारली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण मी तेव्हाच दाबू शकलो असतो. पण मला प्रचंड हेल्पलेस वाटल्याने मी जोराजोरात रडू लागलो. ती घटना मी आज देखील विसरू शकलेलो नाही.