‘बिग बॉस 14’मध्ये ख्रिसमस दणक्यात साजरा झाला. छोटा सँटा आला आणि सोबत कॉमेडियन हर्ष लिंबाचिया याचीही एन्ट्री झाली. कॉमेडीची क्विन भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया बिग बॉसच्या घरात येताच, हास्याचे फवारे उडू लागलेत. पण यादरम्यान हर्ष असे काही बोलला की, सोशल मीडियावर तो जबरदस्त ट्रोल झाला. हर्षने काय केले तर कॉमेडी करण्याच्या नादात एनसीबीची खिल्ली उडवली. ‘आजकल मेरे घर पार लोग सुबह होते ही आ जाते है और बहुत कुछ करके चले जाते है,’ असे हर्ष म्हणाला. त्याचा इशारा एनसीबीने त्याच्या घरी टाकलेल्या धाडीकडे होता.
एनसीबीने सकाळी सकाळी भारती व हर्षच्या घरावर धाड टाकली होती आणि गांजा जप्त केला होता. यानंतर भारती व हर्ष दोघांनाही अटक झाली होती. हर्ष व भारती सध्या जामीनावर आहेत.
हर्षने चक्क एनसीबीची खिल्ली उडवावी, हे अनेकांना आवडले नाही. मग काय त्याला लोकांनी चांगलेच फैलावर घेतले. काहींनी त्याच्या बिग बॉसच्या घरात जाण्यावरही आक्षेप नोंदवला. ‘ड्रग्ज घेतल्याचे याने स्वत: कबुल केले होते. याऊपरही बिग बॉस 14 च्या मेकर्सनी त्याला घरात जाण्याची परवानगी दिली. हर्ष लिंबाचिया एक गुन्हेगार आहे, कदाचित हे मेकर्स विसरले,’ असे लिहित एका युजरने संताप व्यक्त केला.
अन्य एकाने तर यापुढे जात, ‘हर्षला बिग बॉसच्या घरात नाही तर रिहॅब सेंटरमध्ये जायला हवे,’ असे म्हणत त्याला ट्रोल केले.ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला असली तरी लोकांच्या मनात त्यांच्या विषयी राग बघायला मिळत आहे.
जामिन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षलाट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. यादरम्यान हर्षने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते. कुणी भारती आणि हर्षला बॉयकॉट करण्याचे म्हटले होते तर कुणी थेट द कपिल शर्मा शो बॉयकॉट करा, अशा कमेंट केल्या होत्या. अशात एका युजरने जेव्हा भारतीला बॉयकॉट करण्याची कमेंट केली तर हर्षने त्याला ‘आता झोपा काका’, असे उत्तर दिले होते.एनसीबीने दोघांच्या घरी धाड टाकली असता तिथे त्यांना 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता. ज्यानंतर दोघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.