Join us

Bigg Boss 15: नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण; 'स्पर्धक आहेस मर्यादेत राहा' रितेशने दिला राखीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 5:30 PM

Rakhi sawant and ritesh: रितेश-राखीच्या वादामागे देवोलिना कारणीभूत असल्याचं पाहायला मिळत आहे.इतकंच नाही तर रितेशने राखीची मनधरणी केल्यानंतरही ती त्याच्याशी बोलत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉसचं १५ वं (bigg boss 15) पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. सुरुवातीच्या काळात या घरातील प्रेम प्रकरण आणि वादविवाद यांची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली होती.  परंतु, आता या घरात दररोज अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आणि राखी-रितेश (rakhi sawant and ritesh) या तिघांची चर्चा होते. एकीकडे अभिजीत बिचुकले आणि रश्मी देसाई (Rashami Desai) बिग बॉसच्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे राखी आणि तिचा पती रितेश यांच्यात वाद होतांना दिसत आहे. यामध्येच बिग बॉसच्या घरात आल्यापासून राखी-रितेशच्या नात्यात दरी निर्माण झाली  आहे. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला असून रितेश, राखीला मर्यादेत रहा असं सांगणार आहे.

'कलर्स टीव्ही'ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर 'बिग बॉस १५' चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राखी सावंत आणि रितेश एकमेकांसोबत वाद घालतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे या वादामागे देवोलिना (Devoleena Bhattacharjee) कारणीभूत असल्याचं पाहायला मिळत आहे.  देवोलिना तिच्या जीवनातील घडून गेलेल्या कटू आठवणी रितेशसोबत शेअर करत होती. मात्र, देवोलिनाच्या याच आठवणींमुळे रितेश-राखीमध्ये वाद होतो. 

देवोलिनामुळे रितेश-राखीमध्ये वादाची ठिणगी

देवोलिना तिच्या एका रिलेशनशीपविषयी रितेशला काही गोष्टी सांगत होती. ज्यानंतर राखी, रितेशला देवोलिना काय सांगत होती हे विचारते.त्यावरुन या दोघांमध्ये वाद होतो. देवोलिना तुझ्यासमोर का रडत होती?, असा प्रश्न राखी विचारते. त्यावर ती तिच्या जुन्या रिलेशनशीपविषयी मन मोकळं करत होती, असं उत्तर रितेश देतो. मात्र, राखीला देवोलिनावर विश्वास नसल्यामुळे ती तुला इमोशनल करतीये असं सांगते. यावरुन यांचा वाद होतो आणि रितेश राखीला मर्यादेत राहायला सांगतो.

"ज्यावेळी हे लोक तुला फसवतील ना. त्यावेळी तू बरोबर माझ्याकडेच येशील. तुला सगळ्या गोष्टी सहज मिळाल्या आहेत त्यामुळे तुला कशाची किंमत नाही", असं राखी म्हणते. त्यावर रितेश संतापतो आणि,  "तू एक स्पर्धक आहेस आणि त्याच मर्यादेत राहा. मला उगाच शिकवायची गरज नाही", असं रितेश सांगतो.

दरम्यान, रितेश आणि राखीमधला हा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. रितेशला त्याची चूक उमगल्यानंतर तो राखीची मनधरणी करतो. परंतु, राखी त्याच्याशी बोलणं बंद करते. इतकंच नाही तर ती त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करते. त्यामुळे आता या दोघांमधील वाद कुठपर्यंत जातोय. हे भांडण असंच पुढे सुरु राहणार की दोघांमधील मतभेद मिटणार हे येत्या काळातच प्रेक्षकांना समजेल. 

टॅग्स :बिग बॉसराखी सावंतसेलिब्रिटीटेलिव्हिजन