Bigg Boss 16 Controversy : ‘बिग बॉस 16’ या टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. या वादाचं कारण आहे दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan ). साजिदने ‘बिग बॉस 16’मध्ये एन्ट्री घेतली तेव्हापासून घराबाहेरचं वातावरण पेटलं आहे. ‘मीटू’ प्रकरणात अडकलेल्या साजिदला बिग बॉसमधून बाहेर काढा, अशी मागणी होत आहे. अनेक अभिनेत्री व मॉडेल्सनी त्याच्याविरोधात नव्याने मोहिम छेडली आहे. अशात अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra)आता थेट पोलिसांत धाव घेतली आहे. इतकंच नाही तर थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 16’मधून साजिदची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
बुधवारी शर्लिन चोप्रा मुंबईच्या एका पोलिस ठाण्याबाहेर दिसली. यावेळी मीडियासोबत बोलताना तिने साजिदविरोधातील पोलिस तक्रारीची कॉपी दाखवली. माझ्यासकट अनेकांनी साजिदला ‘बिग बॉस 16’मधून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. पण ‘बिग बॉस 16’ मेकर्सनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. आता मी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे. आम्हा पीडित महिलांचा आरोपी ‘बिग बॉस 16’मध्ये आहे, तोपर्यंत प्रसारणचं रद्द करण्याची मागणी आम्ही केली आहे, असं शर्लिन म्हणाली. शर्लिनचे वकील सोहेल शरीफ यांनी सांगितलं की, अभिनेत्रीने साजिद खानविरोधात विविध कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. साजिदला ‘बिग बॉस 16’मधून काढून टाकण्यात यावं, अशी मागणीही तिने केली आहे. आम्ही कलर्स वाहिनीला सुद्धा नोटीस बजावणार आहोत.
ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ
शर्लिनने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना उद्देशून म्हणते, ‘केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या साजिद खानला बिग बॉस.च्या घरातून काढावं. जोपर्यंत साजिदला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत या शोचं प्रसारण बंद करावं, अशी मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करत आहे. देशातील महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या प्रतिष्ठेशिवाय कोणत्याही चॅनेल किंवा शोचा टीआरपी महत्त्वाचा नाही. साजिदला शोमधून काढून टाकण्यासाठी आम्ही बिग बॉसलादेखील विनंती केली होती. परंतु, त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. कृपया, तुम्ही या पत्राकडे आणि आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार नाहीत, ही अपेक्षा आहे.