'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi) विजेता शिव ठाकरे (shiv thakre) हे नाव आज संपूर्ण देशभरात गाजत आहे. मराठीसह हिंदी बिग बॉस, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा अशा कितीतरी रिअॅलिटी शोमध्ये तो लागोपाठ झळकला. त्यामुळे आज त्याचा चाहतावर्ग केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीपूरता मर्यादित राहिला नसून त्याची क्रेझ हिंदी कलाविश्वापर्यंत पोहोचली आहे. अलिकडेच शिवने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. नुकतीच शिवने लाफ्टर क्वीन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. यात त्याने त्याला कास्टिंग काऊचच्या प्रकारातून थोडक्यात बचावलो असं सांगितलं.
"बिग बॉस मराठी' हा माझा पहिला शो होता ज्यासाठी मला खूप मोठी रक्कम मिळाली होती. मला २५ लाख रुपये प्राइज मनी मिळाली होती. त्यातून ८ लाख रुपये रक्कम सेकंड रनरअपला द्यावी लागली. त्यावेळी मेकर्सने माझ्या आईवडिलांसाठी फ्लाइटचं तिकीट सुद्धा काढून दिलं नव्हतं. माझ्या पैशातच मला ते काढावं लागलं होतं. प्राइज मनी मिळाल्यानंतर टॅक्स वगैरे कट करुन माझ्या हातात फक्त ११ लाख रुपये आले होते. त्यातूनच मी माझ्या डिझायनर आणि मॅनेजरला त्यांचे पैसे दिले होते. त्यानंतर मला बिग बॉस १६ साठी कॉल आला. त्यावेळी मला ते इतकी फी देतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता", असं शिव म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "बिग बॉस हिंदी केल्यानंतर एका वर्षभराच्या आतच माझ्या आयुष्यात अनेक बदल घडले. बिग बॉसमधून मला पैसे तर मिळालेच पण खतरों के खिलाडी, झलक दिखला जा सारखे शो सुद्धा मिळाले. रिल्स पोस्ट करण्यापासून ते गेस्ट अपिरियन्ससाठी सुद्धा पैसे मिळू लागले. माझा मॅनेजर मला कायम म्हणायचा की हे पैसे फारच कमी आहेत. पण, मला ते मिळणारे पैसेही खूप वाटायचे."
कास्टिंग काऊचचा आला अनुभव
'बिग बॉस मराठी'नंतर मला एका इव्हेंटला जायचं होतं. ज्याच्यासाठी मी कपडे घेण्यासाठी एका स्टुडिओमध्ये गेलो होतो कपड्यांचं माप देण्यासाठी. पण,तिथल्या एका टीम मेंबरला मी आवडलो आणि तो माझ्या मागेच लागला. कपडे दाखवण्याऐवजी तो सतत मला स्पा साठी बोलवत होता. शेवटी वैतागून मी तिथून निघून आलो. पण, तो सतत मला मेसेज करुन मी स्पासाठी कधी येणार विचार होता."