Join us

Shiv Thakare : “तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:07 PM

Bigg Boss Fame Shiv Thakare On Casting Couch: कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणं बॉलिवूडमध्ये वेळोवेळी उघडकीस आली आहेत. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा शिव ठाकरे यालाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला.

Bigg Boss Fame Shiv Thakare On Casting Couch:  शोबिजच्या दुनियेतील ग्लॅमर लोकांना आकर्षून घेते. पण झगमगाटामागंच वास्तव खूप वेगळं आहे. ग्लॅमर दुनियेतला कास्टिंग काऊच हा प्रकार आता बंद झालेला असल्याचा कितीही दावा केला जात असला तरी वास्तव बदललेले नाही. कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणं बॉलिवूडमध्ये वेळोवेळी उघडकीस आली आहेत. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा शिव ठाकरे यालाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला. आपल्या या धक्कादायक अनुभवाबद्दल त्याने नुकताच खुलासा केला. अलीकडेच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने कास्टिंग काउचबद्दल बोलला.

काय म्हणाला शिव?“मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशनसाठी गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘इथे मसाज सेंटर आहे’.  ऑडिशन आणि मसाज सेंटरचा संबंध मला समजेना. यानंतर तो मला म्हणाला, ‘ऑडिशननंतर एक वेळा तू इथे ये. तू वर्कआउटपण करतोस का…’ ते ऐकून अक्षरश: मी तिथून पळ काढला.  तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद घालायचा नव्हता, म्हणून मी तिथून बाहेर पडणंच योग्य समजलं.  या घटनेनंतर मला एक गोष्ट लक्षात आली की कास्टिंग काऊचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही,”असं तो म्हणाला.

शिवने आणखी एक असाच अनुभवही शेअर केला. त्याने सांगितलं, “चार बंगल्यात एक मॅडम होत्या.  मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं, अशा त्या बढाया मारायच्या. रात्री ११ वाजता त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलवलं. इतक्या रात्री कोणत्या ऑडिशन होतात, हे न कळण्याइतपत मी भोळा नाहीच. मला काम आहे, त्यामुळे येऊ शकत नाही, असं मी त्या मॅडमला स्पष्ट सांगितलं. यावर ‘तुला काम नाही करायचं का? तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही, अशा अनेक गोष्टी त्या मॅडमनी मला सुनावल्या होत्या. असं बोलून असे लोक तुम्हाला डिमोटिव्हेट करतील, पण मी याची पर्वा करत नाही...”   

बिग बॉसमुळे शिव ठाकरे घराघरात पोहोचला. शिव ठाकरे हे नाव आता सर्वत्र लोकप्रिय झालं आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा अनेक कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. 'बिग बॉस १६'च्या फिनालेमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन एकमेकांशी जोरदार टक्कर देताना दिसले. परंतु, एमसी स्टॅनने या शोची ट्रॉफी जिंकली. एमसी स्टॅनने हा शो जिंकला असला, तरी शिव ठाकरे याने लोकांची मने जिंकली आहेत.

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉसकास्टिंग काऊच