Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : ‘बिग बॉस 16’मध्ये या आठवड्यात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरात नुसते राडे पाहायला मिळाले. याचदरम्यान अर्चना गौतम आणि साजिद खान यांच्या भांडणाने अख्ख बिग बॉसचं घर दणाणून सोडलं. दोघांनी एकमेकांना नको ते सुनावलं. या भांडणावर सलमान खान काय प्रतिक्रिया देतो, हे बघणं इंटरेस्टिंग होतं. तर कालच्या वीकेंड का वारमध्ये अपेक्षेनुसार, सलमानने अनेक स्पर्धकांची शाळा घेतली. साजिद खानला सुद्धा त्याने फैलावर घेतलं.
आत्तापर्यंत साजिद खूप सेफ खेळत होता. पण अर्चनासोबतच्या भांडणात साजिद रागाच्या भरात अर्वाच्य बरळताना दिसला. यामुळे सलमान भडकला अन् वीकेंड का वारमध्ये त्याने साजिदला चांगलंच सुनावलं. वाईट शब्दांचा वापर करणाऱ्या अर्चनाचीही त्याने क्लास घेतला, पण सर्वाधिक साजिदवर त्याचा रोष दिसला.
मी खूप मोठा डायरेक्टर आहे. तुला बिग बॉसमधून काढू शकतो, असं भांडणात साजिद अर्चनाला बोलून गेला. त्याने अर्चनाला शिव्याही हासडल्या. सलमानने हा मुद्दा उचलून धरत साजिदला आरसा दाखवला. साजिद तुम बडे डायरेक्टर होगे, लेकिन तुम बिग बॉस नहीं चलाते हो..., अशा शब्दांत सलमानने साजिदला फैलावर घेतलं.
अर्चनाला कुणीही बिग बॉसच्या घरातून बाहेर काढू शकत नाही. मी नाही, बिग बॉस देखील नाही... हे ठरवण्याचा अधिकार फक्त प्रेक्षकांचा आहे. तुला वाटतं तू नेहमी योग्य आहेस, पण असं नसतं. बिग बॉसचा शो हा काही तुझ्यामुळे सुरु नाहीये. तेव्हा या शोमध्ये सगळ्यांशी नीट वागायचे. आपण काय बोलतो आहोत, कुणाला बोलतो आहोत हे जरा ओळखायला शिक,अशा शब्दांत सलमानने साजिदचे कान टोचले. यानंतर सलमानने साजिद व अर्चनाचा वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला. दोघांना एकमेकांची माफी मागण्यास सांगितलं.