टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेलं 'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठमोळी अंकिता लोखंडे 'बिग बॉस १७मधील चर्चेतील चेहरा आहे. पवित्रा रिश्तामधून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने बिग बॉसमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकून घेत टॉप ५मध्ये जागा मिळवली आहे. पण, 'बिग बॉस'च्या घरात सतत सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतल्याने अंकिताला ट्रोल केलं गेलं होतं. आता पहिल्यांदाच याबाबत अंकिताने मौन सोडलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात नुकतंच मीडिया रिपोर्टरने हजेरी लावत सदस्यांना प्रश्न विचारले. अंकिताने अनेकदा 'बिग बॉस'च्या घरात सुशांतचा उल्लेख केला होता. सहानुभूती मिळवण्यासाठी अंकिता सुशांतच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप अभिनेत्रीवर होत होता. अंकिताच्या सासूनेही याबाबत भाष्य केलं होतं. याबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला. "सुशांतचं नाव घेणं हा तुझ्या खेळाचा भाग होता का? त्याच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळवण्याासाठी तू हे केलंस का?" असं अंकिताला विचारण्यात आलं.
यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली, "नाही. असं काहीच नाहीये. मी आणि अभिषेक नेहमीच त्याच्याबद्दल बोलत असतो. आम्ही दोघंही त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. अभिषेकला सुशांतसारखं बनायचं आहे. मी नेहमीच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवरुन जर मी त्याच्याबद्दल चांगलं बोलत असेन, तर त्यात प्रॉब्लेम काय आहे? त्याने चांगलं काम केलं आहे. आणि मी त्याबाबत निश्चितच बोलू शकते. मी त्याचा प्रवास पाहिला आहे."
दरम्यान, 'बिग बॉस'मध्ये अंकिता पती विकी जैनसह सहभागी झाली होती. पण, विकी जैनला फायनलचं तिकीट मिळू शकलेलं नाही. त्यामुळे त्याला घराबाहेर पडावं लागलं आहे. अंकिताबरोबर मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी हे 'बिग बॉस १७'चे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. आता 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? हे पाहणं रंजक ठरलं आहे.