Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. नुकताच मराठीनंतर आता 'बिग बॉस हिदीं'चा १८ वा सीझन सुरू झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये रुपेरी पडद्यावरचे लोकप्रिय चेहरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले आहे. 'बिग बॉस १८' मध्ये ९० च्या दशकातील 'सेन्सेशनल क्वीन' शिल्पा शिरोडकर देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, अभिनेत्रीने या कार्यक्रमामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
सोशल मीडियावर 'बिग बॉस १८' एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शिरोडकरने तिच्या आयुष्यात घडलेल्या अज्ञात बाजूवर प्रकाश टाकला आहे. यासोबतच शिल्पा शिरोडकर स्पर्धेक गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बोलताना भावुक होते. आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य करताना अभिनेत्री रडू लागते. त्यादरम्यान शिल्पा शिरोडकर म्हणते, "माझे पती अपरेश रंजीत यांनी त्यावेळी मला मोठा धीर दिला. माझ्यासाठी तो एक स्ट्रॉंग पिलर होता. जेव्हा २००८ मध्ये माझ्या आई-वडिलाचं निधन झालं, तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते. तेव्हा अपरेश त्यांच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना सगळं काही सोडून ते भारतात परत आले. त्यांनी माझ्यासाठी हा निर्णय घेतला नसता तर आता ते इंडस्ट्रीत खूप यशस्वी झाले असते".
याचदरम्यान गुणरत्न सदावर्ते शिल्पा शिरोडकरच्या अभिनयाचं कौतुक करतात. तेव्हा सदावर्ते म्हणतात, "तुम्ही त्या अभिनेत्रींपैकी एक होतात ज्यांनी माधुरी दीक्षितला टक्कर दिली असती. परंतु, तुम्ही अचानक इंडस्ट्री सोडली. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, या नशिबाच्या गोष्टी आहेत, पण मला या निर्णयाचा पश्चाताप होत नाही".
शिल्पा दिसायला अतिशय सुंदर आणि स्वभावाने अतिशय शांत वाटते. आता बिग बॉसच्या घरातील षडयंत्रांना ती कशी सामोरी जाणार की ती देखील यात सामील होणार हे खेळ पाहताना कळणार आहे. यावेळी बिग बॉस १८ मध्ये चाहत पांडे, गुणरत्न सदावर्ते, शहजादा धामीसह अनेक टीव्ही कलाकार, इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.