Bigg Boss 18: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले. पहिल्या दिवसापासूनच सदावर्ते बिग बॉसच्या घरात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. घरातील सदस्यांबरोबर त्यांच्या हटके स्टाइलने मैत्री करण्याबरोबरच ते प्रेक्षकांचंही पुरेपूर मनोरंजन करत आहेत.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि अभिनेता करण वीर मेहरा यांच्यात वाद झाला आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यानचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत करणने सदावर्तेंना नॉमिनेट केलं आहे. त्यानंतर सदावर्तेंचा पारा चढल्याचं दिसत आहे. "ते गेममध्ये दिसत नाहीत. बऱ्याचदा ते झोपलेलेच दिसतात", असं म्हणत करणने सदावर्तेंना नॉमिनेट केलं.
त्यानंतर सदावर्ते करणला म्हणतात, "काय नाव आहे याचं करण...मी तुला ओळखत नाही. कारण, मी तुला बघितलेलं नाही". त्यानंतर करणचाही पारा चढल्याचं दिसत आहे. तो सदावर्तेंना म्हणतो, "तुम्हालाही या घरात कोणी ओळखत नव्हतं". करणचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सदावर्ते भडकतात. ते म्हणतात, "मी एकदा म्हटलं की म्हटलं....डंके की चोट पर कह रहा हू". त्यावर करण त्यांनी उत्तर देत म्हणतो, "रुको बजाता हूँ मै डंकी की चोट".
सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात राजकारणातील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकारही मीच पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर माझा एनकाउन्टरही होणार होता, असं त्यांनी म्हटलं आहे.