Join us  

Bigg Boss विषयी एक्स स्पर्धक नमिता कौलने केले अनेक खुलासे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 5:52 PM

Bigg Boss या कार्यक्रमातील स्पर्धक निमिता कौलने एक व्हिडिओ नुकताच शेअर करून बिग बॉसच्या घराविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

बिग बॉस 12 या कार्यक्रमात स्पर्धकांचा दिवस कसा असतो. ते खरेच आपले जेवण बनवतात का? साफसफाई करणे यांसारखी कामे करतात का असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो. या कार्यक्रमातील स्पर्धक निमिता कौलने एक व्हिडिओ नुकताच शेअर करून बिग बॉसच्या घराविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धक दररोज जेवण बनवतात असे आपल्याला पाहायला मिळते. पण विकेंट का वार या भागाच्या दिवशी स्पर्धक कोणतेही जेवण बनवत नाही. त्या दिवशी सगळ्या स्पर्धकांना जेवण थेट सलमान खानच्या घरातून येते. सलमान त्याच्या कूककडून या स्पर्धकांसाठी खास जेवण बनवून घेतो. कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधी आजचे जेवण कसे होते हे देखील तो आवर्जून विचारतो. एकदा त्याच्या घरून आम्हाला जेवण आले नव्हते. त्यावेळी त्याने अर्ध्यात चित्रीकरण थांबवून प्रोडक्शन टीमची कानउघाडणी केली होती असे तिने या व्हिडिओत सांगितले आहे. तसेच शनिवारी बिग बॉसमधील सगळ्याच स्पर्धकांना सु्ट्टी असते. त्या दिवशी सगळे आराम करतात.

बिग बॉसच्या घरात असताना स्पर्धकांना दारू मिळत नाही. पण सिगरेट पिण्याची परवानगी असते. तसेच सकाळी स्पर्धकांना उठवण्याची वेळ देखील ठरलेली नसते. दररोज वेगवेगळ्या वेळेत त्यांना उठवले जाते. या कार्यक्रमात जाताना प्रत्येक स्पर्धक केवळ दोन बँगा घेऊन जाऊ शकतो. काही वेळा स्पेशल ड्रेस किंवा मेकअप साहित्य बाहेरून मागवता येते. तसेच कार्यक्रमातील क्रू मेंबर्स सतत स्पर्धकांच्या आसपास असतात. घरात सगळीकडे काचा असल्याने ते स्पर्धकांना पाहू शकतात. पण स्पर्धक त्यांना पाहू शकत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी अनेकवेळा क्लिनर्स घराची स्वच्छता करतात. 

बिग बॉस कार्यक्रमाच्या प्रिमियरपूर्वी कोणत्याही स्पर्धकाला कोणी पाहू नये याची काळजी घेतली जाते. त्यामुळे स्पर्धकाच्या तोंडावर मास्क बांधला जातो. तसेच घरात जाण्यापूर्वी स्पर्धकांच्या सगळ्या सामानांची चेकिंग केली जाते. कोणत्याही ब्रँडचा उल्लेख कपड्यांवर असल्यास ते कपडे शोमध्ये वापरता येत नाहीत. घड्याळ, पुस्तक, गॉगल यांसारख्या वस्तू घरात घेऊन जायला परवानगी नसते. 

बिग बॉस हा कार्यक्रम स्पर्धकांना मध्येच सोडता येत नाही. या कार्यक्रमाच्या करारानुसार स्पर्धकाने कार्यक्रम अर्ध्यावर सोडल्यास त्याला दोन कोटींचा दंड भरावा लागतो. 

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खान