नवी दिल्ली - रिएलिटी शो बिग बॉस १६ मध्ये टॉप ५ मध्ये असलेली अर्चना गौतमला धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे स्वीय सहाय्यक संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना गौतम यांच्या तक्रारीवरून संदीप सिंह यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मेरठच्या परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
प्रियंका गांधींना भेटू दिले नाहीअर्चना गौतमच्या वडिलांचा आरोप आहे की, संदीप सिंहने आपल्या मुलीसाठी केवळ जातीवाचक शब्द वापरले नाहीत तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. मेरठ पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी कलम ५०४, ५०६ आणि अँट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. माझी मुलगी प्रियांका गांधी वाड्रा यांना भेटण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे, पण संदीप सिंह तिला भेटू देत नाहीत असं अर्चनाच्या वडिलांचे म्हणणे आहे.
अर्चनाने संदीप सिंहवर केले आरोपअलीकडेच चित्रपट अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या अर्चना गौतम फेसबुकवर लाईव्ह आली होती. त्यात तिने संदीप सिंहवर अनेक आरोप केले होते. अर्चना गौतम यांनी आरोप केला होता की, संदीप सिंह याने तिला 'दो कौडी की औरत' म्हणत तू जास्त बोलशील तर तुला पोलीस ठाण्यात टाकेन अशी धमकी दिली. अर्चनाच्या वडिलांनीही मुलीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षिततेची मागणी केली होती.
काँग्रेस नेते संदीप सिंहवर नाराज, अर्चनाचा दावाहस्तिनापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अर्चना गौतम यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले की, काँग्रेस नेते संदीप सिंह यांच्यावर नाराज आहेत. संदीपच्या आजूबाजूला लोक बसलेले आहेत. ते प्रियंका गांधींपर्यंत काहीही पोहोचू शकत नाही, त्यांना कोणी भेटू शकत नाही. प्रियंका गांधींना भेटायला मला जवळपास एक वर्ष लागलं, असं ती म्हणाली. काँग्रेसमध्ये अशा लोकांना का ठेवले जात आहे ते कळत नाही, जे पक्षाचं नुकसान करत आहेत असे अर्चना गौतम म्हणाल्या. मी काँग्रेसमध्ये नाही तर प्रियांका गांधीसोबत सामील झाली आहे.