बिग बॉस मराठी सीझन २ मधून घराघरात पोहचलेले अभिजीत बिचुकलेचे चाहते ते बिग बॉसच्या घरात कधी परतणार, याची वाट पाहत आहेत. तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून बिग बॉसच्या घरात पुन्हा येणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र अभिजीत बिचुकलेलाला न्यायालयाकडून काही दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याला आणखीन काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार आहे.
टाईम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार अभिजीत बिचुकलेच्या प्रकरणाबाबत नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. बिचुकलेने तुरूंगातून बाहेर येण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायलयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे बिचुकलेला काही जामीन मिळाला नसल्याने त्याला तुरुंगातच राहवे लागणार आहे.
बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली. त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये त्याला २२ जूनला जामीनही मिळाला. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्याला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले.