कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून काल बाहेर पडला. आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून काल अटक केली होती. साताऱ्यात त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३५ हजारांचा चेक बाउन्स झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली.
अभिजीत बिचुकले गेल्या काही आठवड्यांपासून बिग बॉस मराठीच्या घरात असल्याने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा या घरातील वावर त्याच्या फॅन्सना चांगलाच आवडत होता. पण आता त्याला अटक केल्यामुळे तो कार्यक्रमात परत येईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिचुकलेला अटक करण्यामागे एक राजकीय षडयंत्र असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे.
अभिजीत बिचुकलेने एबीपी माझाशी नुकताच संवाद साधला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी गेल्या १२ वर्षांपासून वकील संदीप संकपाळ यांचा भाडेकरू आहे. त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेतले होते. पण आता ते ही गोष्ट मान्य करत नाहीयेत. त्यांनी २०१५ मधील एक जुनी केस उकरून काढली असून कोर्टाची दिशाभूल करून माझ्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. यात नक्कीच राजकीय हस्तक्षेप असून राजकीय स्वार्थासाठी माझा उपयोग केला जात आहे. माझ्याविरोधात त्यांना भडकवले गेले असून याचा सोक्षमोक्ष लवकरच लागेल.
बिचुकलेला काल अटक झाल्यानंतर त्याचा रक्दाब वाढल्यामुळे सातारा येथील सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर कोर्टापुढे त्याला सादर करण्यात आले. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून चेक बाऊन्सप्रकरणी त्याला दिलासा मिळाला आहे. पण त्याचसोबत त्याच्यावर खंडणीप्रकरणी देखील खटला या कोर्टात सुरू होता. या खटल्यात त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.