Join us

बिग बॉस मराठी २ स्पर्धक सुरेखा पुणेकर झोपडपट्टीत राहात असल्याने झाला होता त्यांचा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 6:00 AM

सुरेखा पुणेकर यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्या पुण्यातील एका झोपडपट्टीत राहायच्या.

ठळक मुद्देमी अरणेश्वरच्या झोपडपट्टीत राहत होते. त्या झोपडपट्टीत आल्यानंतर दामले चांगलेच हडबडले. माझं घर ७ बाय ९ चं होतं. ते माझ्या घरात आले तेव्हा माझी दोन्ही मुलं दारातच खेळत होती आणि मी घरात काम करत होते. त्यामुळे एखाद्या गृहिणीसारखाच माझा अवतार होता.

सुरेखा पुणेकर सध्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात त्या स्पर्धक असून या कार्यक्रमामुळे त्या खऱ्या आयुष्यात कशा आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेता येत आहेत. आज त्यांना ओळख ही त्यांच्या लावणीमुळे मिळाली आहे. सुरेखा पुणेकर यांनी आज लावणीसमाज्ञी म्हणून आपली एक ओळख निर्माण केली असली तरी त्यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. 

सुरेखा पुणेकर यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्या पुण्यातील एका झोपडपट्टीत राहायच्या. झोपडपट्टीत राहात असल्याने त्यांना काही नृत्य कार्यक्रमांना देखील घेतले जात नसे. याविषयी त्यांनी कलमनामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, महेंद्र अ‍ॅण्ड महेंद्र पुरस्कार नावाचा एक पुरस्कार सोहळा होणार होता. राजश्री नगरकर यांना तो दिला जाणार होता. आणि त्या कार्यक्रमात काही कलाकारांनी आपल्या कला सादर कराव्यात असं आयोजकांनी ठरवलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सुधीर दामले आणि केशव बडगे हे करत होते. केशव हे स्वतः खूप चांगले तबलावादक होते. त्यामुळे त्यांची आणि माझी चांगली ओळख होती. त्यांनी माझा नाचही पाहिला होता. म्हणून असेल कदाचित पण मी त्या पुरस्काराच्या कार्यक्रमात चांगला नाच सादर करू शकते असा त्यांना विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी माझं नाव सुधीर दामले यांना सुचवलं. 

त्या काळात कलाकाराशी काही बोलणी करायची असल्यास बहुधा आयोजक घरीच येत असत. सुधीर दामले आणि केशव बडगे हे दोघंही त्यादिवशी माझ्या घरी आले होते. केशव बडगे यांना माझ्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. पण सुधीर दामले हे खूप श्रीमंत असल्याने ते कधीही झोपडपट्टी परिसरात आले नव्हते. मी तेव्हा अरणेश्वरच्या झोपडपट्टीत राहत होते. त्या झोपडपट्टीत आल्यानंतर दामले चांगलेच हडबडले. माझं घर ७ बाय ९ चं होतं. इतक्या छोट्या घरात कदाचित ते पहिल्यांदाच आले असतील. ते माझ्या घरात आले तेव्हा माझी दोन्ही मुलं दारातच खेळत होती आणि मी घरात काम करत होते. त्यामुळे एखाद्या गृहिणीसारखाच माझा अवतार होता. माझं घर, माझा अवतार पाहून दामले एक मिनिटही माझ्या घरात थांबायला तयार नव्हते. ही काय झोपडपट्टीतील पोरगी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात नाचणार? असं म्हणत ते माझ्या घरातून निघून जाऊ लागले. 

तेवढ्यात त्यांना अडवून केशव बडगे म्हणाले, ‘मी स्वतः या मुलीचा नाच पाहिला आहे. ती एक चांगली कलाकार आहे. ती एकदा कशी नाचते ते पहा. त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.’ बडगेंनी दामलेंना इतकं सांगूनही ते माझ्या घरात थांबायला तयार नव्हते. ‘ही मुलगी आपल्याला नको रे बाबा आपल्या कार्यक्रमात,’ असं म्हणून ते निघून गेले. चहा प्यायचं सोडा पण त्यांनी माझ्या घरी साधं पाणी पिणंही पसंत केलं नाही.

टॅग्स :सुरेखा पुणेकरबिग बॉस मराठी