छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन काही दिवस उलटले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कलाकारांचा समावेश आहे मात्र किर्तनकार तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. या शोमध्ये सध्या एक अशी स्पर्धक आहे ज्यांना आतापर्यंत चारवेळा अटक झाली आहे.
भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा आक्रमकपणा सर्वांनी पाहिला आहे. त्यांचे महिलांसाठीचे काम सर्वांनी पाहिले आहे. आता त्या बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाल्या आहेत. सुरूवातीला घरात शांत दिसणाऱ्या तृप्ती देसाई आता आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांचा घरातील काही महिला सदस्यांसोबत वादही झाल्याचे पहायला मिळाले. तृप्ती देसाईंना आतापर्यंत चार वेळा तुरूंगात जावे लागले आहे.
भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आपल्याला अनेक आंदोलनात पहायला मिळाल्या आहेत. सुरूवातीला तृप्ती देसाई यांनी म्हणजे २००३ मध्ये झोपडपट्टी निर्मूलनासाठी कार्य करणारा क्रांतीवीर संघटनेसोबत आंदोलन केले आहे. यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती.
तृप्ती देसाई यांनी २००७ मध्ये अजित को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा उघडकीस आणला. हा घोटाळा जवळपास पन्नास कोटी रुपयांचा होता. यावेळेसही त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी २०१० साली भुमाता ब्रिगेडची स्थापना केली. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तृप्ती देसाईंनी अजित पवार यांच्या विरोधातील आंदोलन केले होते. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती.