Join us

होय आमचा पॅडी जोकरच आहे! मराठी अभिनेत्याची जान्हवीला सणसणीत चपराक, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:54 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पॅडी कांबळेचा बिग बॉसच्या घरात जान्हवीने जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकरने पोस्ट लिहिली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. अनेकदा घरातील सदस्यांशी बोलताना निक्की आणि जान्हवीची जीभ घसरल्याचं दिसत पाहायला मिळालं. निक्की आणि जान्हवीने भांडणात दिग्गज अभिनेत्री असलेल्या वर्षा उसगावकर यांचा अपमानही केला होता. आता पुन्हा पंढरीनाथ कांबळेशी बोलताना जान्हवीची जीभ घसरली आहे. 

बिग बॉसच्या घरात सदस्यांचा अपमान आणि अपशब्द वापरल्याबद्दल रितेश देशमुखने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर खडे बोल सुनावले होते. पण, जान्हवीकडून वारंवार पुन्हा तीच चूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर जान्हवीने आता तिचा मोर्चा पॅडीकडे वळवला आहे. पॅडी कांबळेचा बिग बॉसच्या घरात जान्हवीने जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकरने पोस्ट लिहिली आहे. 

अभिजीत केळकरची पोस्ट 

होय आमचा पॅडी 'जोकर'च आहे...

कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा...

slapstick चा हुकमी एक्का...गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता. बऱ्या वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या ups n downs मधून ताऊन सुलाखून निघालेला...पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळया सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस... 

मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी...मी आत्ताच तुझी finaleची AV बघतोय...ह्या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं "छू" केलंयस. त्यांचं त्यांनाही कळलं नाहीये 🤣 हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी nervous होऊ नकोस. तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच...

रितेशभाऊ, कलर्स मराठी...पॅडीबद्दल जे बोललं गेलंय ते ही अक्षम्यच आहे. पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर ताईंनी माफ केलं असेल कदाचित, पण आम्ही कधीच करणार नाही.

जान्हवी नेमकं काय म्हणाली? 

टास्कनंतर जान्हवी म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत." त्यावर पॅडी म्हणाला, "ती आपल्या अ‍ॅक्टिंगबद्दल वगैरे बोलते. तिला बाहेर आल्यावर इतकं भोवेल ते. तिला खूप त्रास होईल. एका इंडस्ट्रीत आहोत कधी ना कधीतरी क्लॅश होणार. मला आशा आहे की तिला कळेल की पॅडी कांबळे असेल तर मी काम नाही करणार. मी देवाकडे याविषयी प्रार्थना करतो."

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकाररितेश देशमुखअभिजीत केळकर