Janhavi Killekar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाने अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीही अजूनही प्रेक्षकांमध्ये या शोबद्दल चर्चा होताना दिसते. यंदाच्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा ठणाणा काही वेगळाच होता. शिवाय या पर्वात काही असे चेहरे होते जे कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. त्यातील एक म्हणजे जान्हवी किल्लेकर. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने बिग बॉसमराठीच्या घरात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
बिग बॉस मधून बाहेर येताच जान्हवीने लोकमत फिल्मीसोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "आमचा जो ग्रुप होता त्यामध्ये सगळे तापट डोक्याचे होते. मग आम्ही जे करू ते योग्य असं तेव्हा प्रत्येकाला वाटायचं. सगळं छान होतंय, असं वाटत होतं. खरंतर तिथे जाऊन लोकांचं मनोरंजन करणं हे आमचं काम होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्याने प्रेक्षकांचं मनोरंज होऊ शकतं, असं आमचं मत होतं. भले ते कोणीही मुद्दाम करत नव्हतं".
पुढे जान्हवी म्हणाली, "पण जे काही घडतं होतं ते मी थांबवू शकले असते. शिवाय तेव्हा मी स्वत: ला थांबवलं नाही. जशा गोष्टी होत गेल्या तशी मी त्यावर व्यक्त होऊ लागले. या सर्व गोष्टीला आमचा ग्रुप कारणीभूत आहे, असं माझं म्हणणं नाही. पण, ग्रुपच्यासोबत असताना तो ग्रुप जसा वागतो तसं आपण वागतो. एकतर आमचा ग्रुपमध्ये सगळे तापट डोक्याचे होते आणि विरुद्ध ग्रुपमधील लोक शांत स्वभावाचे होते. त्यामुळे सुरूवातीला तशी जान्हवी प्रेक्षकांना पाहायला मिळाली".