Kedar Shinde : काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi ) च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीचा शोमध्ये होणारे वाद-विवाद, स्पर्धकांची धमाल मस्ती चर्चेचा विषय ठरतो. बऱ्याचदा यामुळे अनेकांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. यावर कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकमत फिल्मी'सोबत बातचीत करताना त्यांनी कलाकारांच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.
अलिकडेच केदार शिंदे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले. त्यादरम्यान केदार शिंदे म्हणाले, "बिग बॉस'मुळे रितेश भाऊंनाच नाही तर मलाही ट्रोल करण्यात आलं. मला फक्त एकच वाटतं, मी नेहमीच हा विचार करतो की हल्ली ट्रोलर्स खूप पर्सनल बोलतात. म्हणजेच डायरेक्ट घरच्यांवर जातात. हे खूपच चुकीच आहे. ठीक आहे तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर वैयक्तिकरित्या बोलू ना. तसंही नसेल समोर येऊन बोला. पण आमच्या घराच्यांवर म्हणजेच आई, बायको, मुलींवर बोलू नका. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे लोकांना देतो, मग आपण कशा पद्धतीने संस्कृती सांभाळतो. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे".
केदार शिंदे यांचा हा 'बिग बॉस'चा पहिलाच अनुभव होता. या प्रवासाचाही त्यांनी मुलाखतीत उलगडा केला. तसंच इतर सदस्यांविषयीही त्यांनी मत मांडलं. आता पुढचा सीझन कधी येणार, यातही रितेशच होस्ट असणार का यावरही ते बोलले आहेत.