Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अनेकदा घरातील सदस्यांशी बोलताना जान्हवीची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. जान्हवीने वर्षा उसगावकर यांच्याशी वाद घालताना अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यावरुन भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिला सुनावलंही होतं. तरीदेखील आता पुन्हा पंढरीनाथ कांबळेशी बोलताना जान्हवीची जीभ घसरली आहे. यामुळे जान्हवीला ट्रोल केलं जात आहे.
अनेक सेलिब्रिटींनीही पॅडीला पाठिंबा देत जान्हवीला खडे बोल सुनावले आहेत. आता मनसेनेही पॅडीला फूल सपोर्ट दिला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी पॅडीसाठी खास ट्वीट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी पॅडीला पाठिंबा दिला आहे. "पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला...", असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जान्हवी नेमकं काय म्हणाली?
नुकत्याच पार पडलेल्या टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेचा जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत", असं जान्हवी पॅडीला म्हणाली.
दरम्यान, बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा खेळ अधिक रंजक होत चालला आहे. त्याबरोबरच घरातील सदस्यांची समीकरणंही बदलत असल्याचं पाहायला मिळत आहेत. योगिता चव्हाणबरोबर निखिल दामलेचाही बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन झाल्यामुळे अरबाज पटेल सेफ असेल. त्यामुळे आता कोणत्या सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार असेल, हे पाहावं लागेल.