Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या खेळ दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. घरात टिकून राहण्यासाठी सदस्य रोज नवनवी रणनीती आखताना दिसत आहेत. अनेकांची घरात घट्ट मैत्री झाली आहे. तर काही जण एकमेकांचे पक्के वैरी झालेले दिसत आहेत. घरातील ही समीकरणं दिवसागणिक बदलत आहेत. आता खेळ उत्कंठावर्धक वळणावर असतानाच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारत त्यांना कैचीत पकडलं. या पत्रकार परिषदेत निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत अजब वक्तव्य केलं आहे.
वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी या दोघींनीही पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात आपली जागा बनवायला सुरुवात केली होती. पण, पहिल्या दिवसापासूनच या दोघींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद झाल्याचं पाहायला मिळालं. वर्षांताईंशी बोलताना अनेकदा निक्कीची जीभही घसरल्याचं दिसलं. आता पुन्हा वर्षांताईंबद्दल निक्की बरळली आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या, मराठीबरोबरच बॉलिवूडही गाजवलेल्या वर्षा उसगावकर कोण, हे माहीत नसल्याचं निक्की म्हणाली आहे.
निक्कीला पत्रकारांनी "आपल्यापेक्षा प्रसिद्ध व्यक्तीला आपण टार्गेट केली की दिसू, असा तुझा गेम प्लॅन होता का?" असा प्रश्न विचारला. यावर निक्कीने उत्तर देताना "बिग बॉसच्या घरात येण्याआधी वर्षाताई कोण हे मला माहितच नव्हतं", असं सांगितलं. निक्की म्हणाली, "अभिजीतशिवाय इथे कोणी प्रसिद्ध आहे, हे मला माहीत नाही. पॅडीदादा आणि वर्षाताई प्रसिद्ध आहेत. पण, मला वर्षाताई कोण हे माहीत नव्हतं. त्या खूप मोठ्या स्टार आहेत, पण मला त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं. त्यात काय एवढं". त्यावर जान्हवी तिला "वर्षा उसगावकर कोण हे माहीत नाही आणि ही बिग बॉस मराठीमध्ये आली आहे", असं म्हणते.
दरम्यान, या आठवड्यात हाताला दुखापत झाल्याने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेल्या संग्राम चौगुलेने घराचा निरोप घेतला आहे. तर निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल.