कोरोना काळात ओढावलेल्या संकटाचा सर्वाधिक फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अचानकपणे लॉकडाउन घोषित करण्यात आला. परिणामी, अनेक मालिका, चित्रपट यांच्या चित्रीकरणावर आणि प्रदर्शनावर त्याचा परिणाम झाला. त्यातच आता देशातील इतर राज्यांमध्ये थिएटर आणि नाट्यगृहे सुरु झाली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही ती बंद आहेत. म्हणूनच, गेल्या काही दिवसांपासून नाट्य कलाकार आपल्या मागणीवर ठाम असून चित्रपटगृह, नाट्यगृह लवकरात लवकर सुरु करावीत अशी मागणी करत आहेत. यामध्येच अभिनेता आस्ताद काळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आता प्रेक्षकांनाच थेट प्रश्न विचारला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांनाच नकोसं झालंय का असाच प्रश्न आता आम्हाला पडू लागला आहे. जर तसं खरंच नसेल आणि प्रेक्षकांनीही ते हवं असेल तर त्यांनीदेखील आमची साथ दिली पाहिजे, अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे.
'या' व्यक्तीमुळे शक्ती कपूर झाला सुपरस्टार; नाव ऐकून तुम्हीदेखील व्हाल थक्क
"नाटक आणि चित्रपट....तुम्हाला नकोय का हे?????? प्रेक्षकहो....तुम्हीही आवाज उठवण्यात मदत करा की??!!!!! मायबाप म्हणत आलेत ना तुम्हाला.....मग पोसायला थोडं सोसा की......", अशी पोस्ट आस्ताद काळेने फेसबुकवर शेअर केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यासाठी मराठी कलाकार कसोशीने प्रयत्न करत आहेत. यापूर्वी मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना नाट्यगृह सुरु करण्याविषयीचं निवेदन दिलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील रंगभूमी दिनाच्या निमित्ताने थिएटर सुरु करणार असल्याचं म्हटलं होतं. आस्तादप्रमाणेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील ट्विट करुन सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला होता. राज्यात सांस्कृतिक खातं आहे की नाही, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे.