'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. यात एकूण २२ व्यक्ती ड्रग्ज, कोकेन, गांजासारख्या अमली पदार्थांचं सेवन करताना पोलिसांनी सापडले होते. यात १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिअॅलिटी-शोमधील अभिनेत्रीचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. रिअॅलिटी शोमधील अभिनेत्री ही हीना पांचाळ असल्याचं समोर आलं आहे.
हीना पांचाळ ही 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ट एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. पण महाअंतिम फेरीआधीच तिचा प्रवास संपुष्टात आला होता. हीना पांचाळनं हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिनं 'आयटम साँग' केले आहेत.
नाशिकमधीलइगतपुरीचा परिसर नेहमीच पर्यटकांपासून बॉलिवुडच्या कलाकारांना भुरळ घालणारा ठरला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य अनेकांना खुणावते. याचाच गैरफायदा घेत अंमली पदार्थांची नशा करण्याकरिता मुंबई येथून हायप्रोफाईल सिनेतारकांचाही राबता या भागात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा समुहाची पार्टी होत असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदेशी महिलाही जाळ्यात१०पुरुष, १२ महिलांसह एकुण २२उच्चभ्रू व्यक्तींचा मोठा समुह इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला व स्काय लगून व्हिला या आलिशान बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडले. यामध्ये काही महिला थेट बॉलिवुडशी संबंधित असून एक विदेशी महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला इराणची नागरिक असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?रेव्ह पार्टी करण्यासाठी इगतपुरीत दाखल झालेला २२लोकांचा हायप्रोफाईल समुहाने आपल्यासोबत अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तातडीने मुंबईत रवाना करण्यात आले आहे