बिग बॉस मराठीच्या घरात असताना आस्ताद काळेने त्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्याचे नमूद केले होते. ही खास व्यक्ती म्हणजे स्वप्नाली पाटील असून ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्वप्नाली आणि आस्ताद एकमेकांचे अनेक वर्षं फ्रेंड्स आहेत. आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती. यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते. पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना त्यांना नव्हती. माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते. हा भाग आम्ही घरातील सगळे मिळून पाहात होतो. हा कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले....
बिग बॉस मराठीच्या घरात असताना स्वप्नालीचा विषय कसा निघाला असे आस्तादला विचारले असता त्याने सांगितले, मी माझ्या प्रेमाची कबुली कार्यक्रमात जाऊन देईल असे मी काहीच ठरवले नव्हते. पण मी १०० दिवस या घरात राहायची मानसिक तयारी करून गेलो होतो. मी या घरात येवढ्या दिवस राहिल्यानंतर इतका जिव्हाळ्याचा विषय कधीतरी निघणार याची मला कल्पना होती. त्यात या घरात माझ्यासोबत असलेली मेघा धाडे ही स्वप्नालीची खूप जुनी मैत्रीण आहे. सुरुवातीच्या काहीच दिवसांतच ती मला जिजाजी हाक मारायला लागली. एवढेच नव्हे तर स्वप्नालीच्या नावाने ती मला चिडवत होती. त्यामुळे पहिल्याच की दुसऱ्याच शनिवारी महेश सरांनी (महेश मांजरेकरांनी) मला त्याविषयी विचारले आणि ही गोष्ट सगळ्यांना कळली.
आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. त्यांच्या नात्याला सुरुवात कशी झाली याविषयी विचारले असता आस्ताद सांगतो, आम्ही दोघांनी अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट केला होता. त्या कार्यक्रमात आम्ही दोघे भाऊ-बहीण होतो. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी आम्ही पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर आमची सुरुवातीला मैत्री झाली आणि काहीच महिन्यात मी तिच्या प्रेमात पडलो होतो.
त्यांच्या प्रेमकथेविषयी स्वप्नाली सांगते, आस्तादने मला प्रपोज केले नाही. पण मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्याने मला तू आवडतेस असे सांगितले... त्यावर मला या गोष्टीचा विचार करू दे असे मी त्याला सांगितले आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला.