Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत आहे. अशातच नुकताच रविवारी 'बिग बॉस'च्या घरात भाऊचा धक्का पार पडला. त्यामध्ये रितेश देशमुखने घरामध्ये एन्ट्री घेत सर्व स्पर्धकांना खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळालं. हा एपिसोड पाहून 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर व्यक्त झाला आहे.
सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठीचा एक व्हायरल होणारा प्रोमो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या प्रोमोमध्ये 'लयभारी' अभिनेता रितेश देशमुख पहिल्यांदाच 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतो आणि सगळ्या स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. रितेश देशमुख घरात प्रवेश करताच सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबाचे व्हिडीओ दाखवतो. यावेळी जान्हवीचा मुलगा इशान आईसाठी खास शुभेच्छा देतो. तर धनंजय पोवारचे कुटुंबिय सुद्धा त्याच्यासाठी खास व्हिडीओ पाठवतात. तसेच अभिजीत सावंतच्या मुली लाडक्या बाबाला शुभेच्छा देतात. आपल्या मुलांचे आणि कुटुंबाचे व्हिडीओ पाहताना सर्वजण भावुक होतात.
दरम्यान, अभिनेता अक्षय केळकरने 'बिग बॉस'चं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलंय, "Dear, Bigg Boss Marathi. आत्तापर्यंत मी कोणत्याच स्पर्धकाबद्दल सोशल मीडियावर बोललो नाही आणि आताही बोलत नाही आहे. कारण मला माहीत आहे. ते घर,आतली परिस्थिती, खेळाडूंची मानसिक स्थिती, इमोशन्सचा चढ उतार, योग्य-अयोग्यचा विळखा, निर्णय-संयमाची रोजची परीक्षा, रोज बदलणारी गणित, टिकणारी चुरस, मनाची-बुद्धीची आणि शरीराची सर्वोत्तम कसोटी. या सगळ्यात तुमचं आवडतं ,जेवण आणि तुमच्या आवडीची माणसं मात्र घराबाहेर. फक्त एवढच माहीत असतं की ते घराबाहेरून मला बघत आहेत आणि त्या आशेवर रोज स्वत ला तयार करायचं नवीन आव्हान पेलायला. इथे कोणीच वाईट नसतो".
पुढे अभिनेत्याने 'बिग बॉसचं कौतुक करत म्हटलंय, "बिग बॉस मराठी' चा कालचा एपिसोड खूपच जास्त हृदयस्पर्शी होता. या आठड्यात जे काही घडलं ते, प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या जवळच्या माणसांना बघणं गरजेचं होतं. त्या भावना खरंच त्यांच्या मनातून आमच्यापर्यंत पोहचल्या". कमाल! अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घरातील प्रत्येक सदस्याला टॅग देखील केलं आहे.