Bigg Boss Marathi Season 5: सध्या 'बिग बॉस मराठी'ची सगळीडे चर्चा रंगताना दिसते आहे. गेल्या आठवड्यातच 'बिग बॉस'च्या घरामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे घरात घडणाऱ्या गोष्टी पाहून प्रेक्षक देखील चक्रावले आहेत. मागील आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्कीवर हात उगारल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोर मोठी शिक्षा सुनावण्यात आली. आर्याला 'बिग बॉस'ने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे रॅपर आर्या जाधवचा 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील प्रवास थांबला. अशातच घराबाहेर पडल्यानंतर आर्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर आलेल्यानंतर आर्याने पहिल्यांदा 'काळा रंग आणि तुटलेलं Heart' अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते आहे.
नुकतीच रॅपर आर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहलंय, "जग जगू देत नसेल तरी जगात जागं होणं जरूरी असतं नाहीतर, कधी कधी दिसतं तसं नसतं" असं आर्याच्या पोस्टमुळे नेटकरी संभ्रमात पडले आहे.
आर्या आणि निक्कीमध्ये काय घडलं होतं?
'बिग बॉस मराठी'च्या घरात गुरुवारी कॅप्टन्ससीचा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोणावर हात उगारायला बंदी आहे. 'बिग बॉस'देखील याचा निषेध करतात. कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले. अखेर अंतिमतः आज आर्या जाधवला 'बिग बॉस'ने बाहेर काढलं. त्यामुळे आर्याचा प्रवास संपला आहे.