Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी पाचव्या सीझनमध्ये सध्या धमाल सुरु आहे. हा पर्व सुरु होऊन दोनच दिवस झालेत तरी पहिल्याच दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये भांडणाला सुरुवात झाली आहे. मराठीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यावेळी बिग बॉसच्या घरात आहेत. दरम्यान हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता मराठीतही आलेली निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांच्या नाकीनऊ आणले आहे. पहिल्या दिवसापासूनच दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. वर्षा उसगांवकरांच्या वयाचा मान न राखता निक्कीने त्यांना कशाही भाषेत उत्तरं दिली आहेत. यावर एका मराठी अभिनेत्याने निक्कीला चांगलंच सुनावलं आहे.
निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच राडा झाला आहे. कालच्याच एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्कवेळी निक्की त्यांना काळ्या मनाच्या मॅम असं म्हणाली. तसंच इतर वेळीही त्यांना उद्देशून वाईट भाषा वापरली. निक्कीचं हे वागणं पाहून प्रेक्षकही भडकले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत निक्कीला सुनावलं आहे. तो लिहितो, "निक्की, तुला मॅनर्स हा शब्द माहित आहे का? एका ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्रीसोबत असं वर्तन करणं हे फार निराशाजनक आहे. मॅम आम्ही तुमच्यासोबत आहोत. खेळ खेळण्याची एक पद्धत असते..कोणीही प्रतिष्ठेला धक्का लावता कामा नये. वर्षा मॅम, मी तुमच्यासोबत उभा आहे."
पुष्कर जोगबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये दिसला होता. तो सीझनमध्ये रनर अप ठरला होता. तर मेघा धाडे विजयी झाली होती. पुष्कर जोग सध्या बिग बॉस फॉलो करत असून निक्की तांबोळीच्या खेळावर त्याने आक्षेप घेतला आहे.
बिग बॉसच्या या पर्वातला पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला. घरातील सर्व सदस्यांनी मिळून वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि सूरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या वीकेंडला कोण घराबाहेर जातं याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.