Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात काल राडा पाहायला मिळाला. कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीसोबत झालेल्या झटापटीत तिला कानाखाली मारली. यानंतर निक्कीने खूप धुमाकूळ घातला. बिग बॉसने आर्याला जेलची शिक्षा सुनावली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेशही आर्याची कानउघाडणी करणार आहे. तसंच आर्याचं काय होणार याचा निर्णय होणार आहे. दरम्यान निक्की तांबोळीची आई प्रमिला तांबोळी यांनी घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रमिला तांबोळी म्हणाल्या, "काल जे बिग बॉसच्या घरात घडलं ते निंदनीय आहे. निक्कीवर आर्याने हल्ला केला. ती फिजीकल झाली.बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला हवी. आम्ही इथे राहून काही करु शकत नाही. पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते. बिग बॉसच्या घरात सतत तिच्यासोबत असं घडतंय. मागच्या आठवड्यात तो संग्राम आला त्याने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि निक्की बेसावध असताना तिला अचानक पाण्यात ढकललं. हे काय आहे? तिला काही त्रास झाला असता, असं अचानक ढकलल्यावर नाकातोंडात पाणी गेलं असतं. नशीब तिला काही झालं नाही ही फार चांगली गोष्ट आहे. पण त्याने हे योग्य केलं नाही. तुम्ही सगळे एवढा बाऊ करता की अरबाज असं करतो तसं करतो, काय केलं त्याने? अरबाज कितीही आक्रमक असला तरी त्याच्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. पण निक्कीला त्रास झालाय. मागे आर्या निक्कीच्या हाताला चावली. तिचा हात काळा निळा पडला होता त्याचीही बिग बॉसने दखल घेतली नव्हती. हे कुठेही वीकेंडला दाखवलं नाही. हे असं कसं?"
नको त्या गोष्टी उकरुन काढता आणि दाखवता. पण निक्कीसोबत घरात सतत असं होतंय. काल आर्याचं टास्क खेळण्याऐवजी निक्कीला कसा त्रास देता येईल, कसं अडवायचं याकडेच लक्ष होतं. अंकिता, आर्या, वर्षा ताई यांनी हे ठरवूनच केलं. बिग बॉसनेही असेच ग्रुप बनवले जिथे त्यांच्यासमोर त्यांनी निक्कीला ठेवलं. बाकीचे काही खेळतच नव्हते. जर बाकीच्यांना निक्कीला खेळूच द्यायचं नव्हतं तर बिग बॉसने सांगायचं होतं की निक्की तू खेळू नको. आर्याने जेव्हा दार लावून घेतलं तेव्हा बिग बॉसने एकदाही म्हटलं नाही की तू दार लावू शकत नाही. त्याचाच परिणाम हा झाला की पुढे तिने निक्कीला मारलं. बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यावी. आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आमची मुलगी काय तिथे मार खायला गेलीये का? चुकीचं आहे हे. कृपया बिग बॉस काहीतरी करा. तिला शारीरिक सुरक्षा मिळायला पाहिजे तर आम्ही निश्चिंत होऊन शो बघू शकतो. नाहीतर आम्हाला आईवडिलांना कसं वाटत असेल याचा विचार करा. आर्या आता घरात नको तिला बाहेर काढा."
प्रमिला तांबोळी यांच्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी मात्र निक्कीलाच धारेवर धरत तुमची मुलगी कशी खेळते ते आधी पाहा असं सुनावलं. 'तुम्हीच तुमच्या मुलीला घरी घेऊन जा' अशा कमेंट्स केल्या आहेत.