Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस ओटीटी ३'ची घोषणा करण्यात आली. नव्या सीझनबरोबरच 'बिग बॉस ओटीटी'ला नवा होस्टही मिळाला आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' सीझन होस्ट करणार आहेत. त्यामुळे या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
९०चं दशक गाजवलेला अभिनेता 'बिग बॉस' होस्ट करताना दिसणार आहे. 'मिस्टर इंडिया', 'नायक', 'बेटा', 'तेजाब', 'अंदाज' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमधून अनिल कपूर यांनी चाहत्यांची मनं जिंकली. आता 'बिग बॉस ओटीटी'चा होस्ट म्हणून त्यांना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी अनिल कपूर यांना तगडं मानधन मिळणार आहे. त्यांच्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. पण, त्यांना मिळणार मानधन हे बिग बॉस हिंदी होस्ट करणाऱ्या सलमान खानपेक्षा ६ पटीने कमी आहे.
'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी अनिल कपूर कोटींमध्ये मानधन घेणार आहे. या रिएलिटी शोच्या एका एपिसोडसाठी अनिल कपूर यांना तब्बल २ कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका आठवड्यासाठी ते ४ कोटी फी आकारत आहेत. याआधी करण जोहर 'बिग बॉस ओटीटी' होस्ट करायचा. त्यालाही जवळपास २-२.५ कोटी इतकं मानधन मिळायचं. पण, हे मानधन सलमान खानला मिळणाऱ्या मानधनापेक्षा फारच कमी आहे.
सलमान खान गेली कित्येक वर्ष 'बिग बॉस हिंदी' होस्ट करत आहे. बिग बॉसचा होस्ट म्हणून प्रेक्षकही सलमानला पसंत करतात. सुरुवातीला सलमान या शोच्या एका एपिसोडसाठी २ कोटी रुपये आकारायचा. त्यानंतर त्याच्या मानधनात वाढ होत गेली. 'बिग बॉस १७'साठी सलमान खानने ३५० कोटी घेतल्याची चर्चा होती. तर 'बिग बॉस ओटीटी २' देखील त्याने होस्ट केला होता. यासाठी त्याने प्रत्येक एपिसोडसाठी १२.५ कोटी फी आकारली होती. 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन २१ जूनपासून सुरू होणार आहे.