सुवर्णा जैन
सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असल्या तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि सैफची पालक म्हणून जबाबदारी आहे असं बॉलीवूडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिने म्हटलं आहे. 'गुडन्यूज' या सिनेमाच्या निमित्ताने बेगम करीना कपूर खानशी साधलेला हा संवाद.
'गुडन्यूज' सिनेमाची कथा आयव्हीएफ तंत्रज्ञानावर आधारित आहे की हा केवळ कॉमेडी सिनेमा आहे?
'गुडन्यूज' सिनेमाची कथा आयव्हीएफवर आधारित आहे. महिलाप्रधान हा सिनेमा असून त्याची कथा महिलाच पुढे नेते. यांत माझ्याकडे आणि कियाराकडे बाळ आहे. त्यामुळे रसिकांमध्ये याविषयीची चर्चा आहे. आयव्हीएफवर विषय आधारित कथा असली तरी त्यात विनोदाचा तडकाही आहे. शिवाय सोबतीला कॉमेडीचा मास्टर अक्षय आहेच. उत्तरार्धात या सिनेमाच्या कथेत ड्रामाही पाहायला मिळतो. आयव्हीएफमुळे काहीसा भावनिक अँगलही दिसून येतो.
अक्षयसोबत तू पुन्हा एकदा काम करत आहेस. तुम्हा दोघांची केमिस्ट्री कायमच रसिकांना भावली आहे. तुला काय वाटतं त्याबद्दल?
अक्षय आणि मी एकमेकांना जवळपास तीस वर्षांपासून ओळखतो. तीच केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहायला मिळते. अक्षय ज्यावेळी त्याचा पहिलावहिला सीन शूट करत होता, त्यावेळी कॅमेऱ्यामागे मी होते. त्याच्या 'दीदार' या सिनेमाचा पहिला शॉट मी पाहिला होता. कारण त्या सिनेमात त्याची नायिक करिष्मा होती. त्याला मिळालेले यश पाहून खूप आनंद वाटतो. त्याच्या आयुष्यातला हा सगळ्यात सुंदर काळ आहे असं मला वाटतं.
गेल्या दोन दशकांपासून या चित्रपटसृष्टीत तू काम करते. तुझ्यासाठी आव्हानात्मक काय आहे तैमूरची आई असणं की एक अभिनेत्री असणं?
जीवनाच्या या टप्प्यावर वेळ माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. कुटुंब आहे, तैमूर आहे. माझ्या पालकांचीही मला काळजी घ्यायची आहे. जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहे. त्यामुळेच अक्षयसोबत काम करताना मजा आली. कारण तीस दिवसांत आमचे शुटिंग संपलं. कधी शुटिंग सुरू झालं आणि कधी संपलं हे कळलंच नाही. अक्षय 8 ते 4 काम करतो जे सगळ्यांसाठी परफेक्ट असतं. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी मी कमी सिनेमा स्वीकारते.
तू सिनेमात काम करते आहेस. तैमूरची आई म्हणूनही जबाबदारी पार पाडते आहेस. तर वेळेचं नियोजन करणं किती आव्हानात्मक असतं?
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एकावेळी जास्त काम करण्याची क्षमता असते. त्यातच वेळेचं नियोजन करता येणं गरजेचं असतं. माझ्यासाठी वेळ ही खूप महत्त्वाची असते. संध्याकाळी माझं शुटिंग असेल आणि सकाळी मी काहीच काम ठेवत नाही. त्यावेळी मी घरी राहणंच पसंत करते. सकाळी लवकर कामास सुरुवात करायलाही माझी काहीच हरकत नाही. रात्रीचं जेवण घरीच करणं मी पसंत करते.
तैमूर कायम तुझ्या किंवा सैफसोबत असतो. तर आई म्हणून तुला त्याबाबत काय वाटतं?
मुलांना तुमच्या आयुष्यात स्थान देणं गरजेचं असतं. त्यांना तुमच्या जीवनात सामावून घ्या. तैमूर माझ्यात आणि सैफमध्ये गुंतला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी तो आमच्यासोबत असतो. मी किंवा सैफ शूटिंगला जात असलो तरी तो सोबत असतो. सात महिन्यांचा असल्यापासून तो आमच्यासोबत प्रवास करतो. आमच्या जीवनशैलीसह त्यानं जुळवून घेणं गरजेचं आहे.
मीडियाच्या नजरा कायम तैमूरवर असतात. इतक्या लहान वयातला तो एक सेलिब्रिटी बनला आहे. त्याबाबत आई म्हणून त्याचं बालपण हिरावतं आहे असं वाटतं का?
आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात. तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही. मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत. त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.
जीवनात जोखीम पत्करणं तुला आवडतं. असा एखादा कोणता प्रसंग किंवा घटना आहे जिथे तू जोखीम पत्करली आणि त्यात तू यशस्वी ठरली आहे?
लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही. त्यानंतर लोक बोलू लागले की मुलं झाल्यावर तर बिल्कुलच काम मिळणार नाही. मात्र माझ्याबाबतीत उलट घडत आहे. आजघडीला सिनेमा नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि तैमूरला वेळ द्यायचा आहे. सिनेमा नाकारत असले तरी माझ्याकडे आज पाच सिनेमा आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले.
चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळतं असं वाटतं का?
माझ्या मते प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत आहे. अनुष्का असो किंवा दीपिका किंवा अन्य कुणी अभिनेत्री प्रत्येकीला त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार मानधन मिळतं. त्यात अनेकजण लेखक आणि निर्माते बनत आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलत आहे. प्रत्येकजण मानधनाच्या बाबतीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अभिनेत्री मानधनात न्याय मिळावा यासाठी आवाजही उठवत आहेत. याबाबत सवाल जवाब होत आहेत ही गोष्ट चांगलीच आहे.