'लेडीज स्पेशल' मालिकेद्वारे बिजल जोशी करणार छोट्या पडद्यावर पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:29 PM2018-10-09T16:29:03+5:302018-10-09T16:45:56+5:30
'लेडीज स्पेशल' या मालिकेत गुजराती महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री बिजाल जोशी दिसणार आहे. या मालिकेत ती बिंदू देसाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
उत्कृष्ट संकल्पना आणि नवीन स्टार-कास्टसह सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर 'लेडीज स्पेशल' ही मालिका लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार टीमने कलाकारांची योग्य प्रकारे निवड केली आहे. या मालिकेत महाराष्ट्रातील स्त्रीची भूमिका अभिनेत्री गिरीजा ओक साकारणार आहे. गिरीजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री असून तारे जमीन पर या हिंदी चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
'लेडीज स्पेशल' या मालिकेत गुजराती महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री बिजाल जोशी दिसणार आहे. या मालिकेत ती बिंदू देसाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. बिंदू ही एक आशावादी महिला असून तिचा जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. तिच्यासाठी कोणीही वाईट नाही आणि काहीही चुकीचे नाही आणि अत्यंत सकारात्मकतेने पाहाते. बिजल जोशी यांनी बऱ्याच गुजराती चित्रपट, टीव्ही मालिका आणि रंगमंचामध्ये काम केले आहे. आता 'लेडीज स्पेशल' या मालिकेद्वारे ती हिंदीत पदार्पण करत आहे. याविषयी बिजल जोशी सांगते, "लेडीज स्पेशल या मालिकेचा मी एक भाग झाली असल्याचा मला आनंद होत आहे. मी या आधी कधीच हिंदी मालिकेत काम केले नव्हते. पण या मालिकेची कथा आणि संकल्पना वेगळी असल्याने मी या मालिकेचा भाग व्हायचे ठरवले. गुजराती चित्रपट आणि मालिकेत मी अनेक वर्षं काम करत असल्याने अभिनय हे माझ्यासाठी नवीन नाहीये. माझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा मी बिंदू या पात्रासारखीच आनंदी, आशावादी आहे. तसेच तिच्याप्रमाणे माझ्यात देखील प्रचंड आत्मविश्वास आहे. पहिल्याच हिंदी मालिकेत मला एक खूप चांगली भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी प्रचंड खूश आहे."
'लेडीज स्पेशल' या मालिकेत या तीन स्त्रिया आपले आयुष्य कशाप्रकारे जगतात आणि अनेक परिस्थितींचा सामना करून देखील एकमेकांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध कसे टिकवतात हे दाखवण्यात येणार आहे.