Join us

Amjad khan Birth Anniversary: विमानाला घाबरून ‘गब्बर’ स्वत:च्या कारने निघाला, पण शेवटी व्हायचं तेच झालं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 8:00 AM

दिवंगत अभिनेते अमजद खान (Amjad khan ) आज आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस. 1940 साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता.

दिवंगत अभिनेते अमजद खान (Amjad khan ) आज आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस. 1940 साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. आपल्या फिल्मी करिअरमध्ये अमजद खान यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण प्रेक्षकांच्या काळजावर कोरली गेली ती  त्यांनी साकारलेली ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर’ची भूमिका. ही भूमिका जणू त्यांच्यासाठीच बनली होती. आजही गब्बर म्हटलं की, अमजद खान यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो.

पडद्यावर अमजद खान यांनी अनेक निगेटीव्ह भूमिका साकारल्या. मात्र खऱ्या आयुष्यात ते तितकेच कर्तव्यदक्ष पती व  प्रेमळ पिता होते. 1992 साली वयाच्या 52 व्या वर्षी अमजद खान यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्याआधी ते मृत्यूच्या दाढेतून परतले होते. साल होतं 1978. त्यावेळी अमिताभ बच्चन अगदी देवदूतासारखे अमजद यांच्यासाठी धावून आले होते.

तर ‘द ग्रेट गॅम्बलर’ या चित्रपटाचं गोव्यात शूटींग सुरू होतं. अमिताभ आणि अमजद खान दोघंही चित्रपटात होते. शूटींगसाठी अमजद यांना त्वरित गोव्यात पोहोचावं लागणार होतं. अमजद खान यांच्यासाठी विमानाचं तिकिट बुक केलं गेले. तो निघणार, इतक्यात मुंबईहून मद्रासला निघालेल्या विमानाला मोठा अपघात झाल्यची बातमी त्याला मिळाली. अमजद यांच्या मनात विमानाची भीती होती. या बातमीने ते आणखीच घाबरले आणि त्यांनी फ्लाईटने जाण्याचा निर्णय तिथेच रद्द केला. मी विमानाने नाही, माझ्या स्वत:च्या कारने निघतो, असं दिग्दर्शकाला कळवून ते  अमजद खान स्वत:च्या कारने गोव्याकडे निघाले.

वाटेत कार चालकाला थोडा आराम द्यावा म्हणून अमजद  स्वत: कार चालवायला बसले. कारमध्ये अमजद खान यांचं अख्ख कुटुंब होतं. पुढे काय होणार याची काहीच कल्पना नव्हती. अचानक  त्यांच्या कारची आणि समोरून आलेल्या एका ट्रकची जोराची  टक्कर झाली. या अपघातात अमजद खान व कुटुंबीयांना गंभीर दुखापत झाली. अमजद खान यांची प्रकृती तर चिंताजनक होती. ते कोमात जाण्याची शक्यता होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. अपघातात अमजद यांचं बरंच रक्त वाहून गेलं होतं. त्यांना तातडीने रक्ताची गरज होती.

काही स्थानिक लोकांनी अमजद व त्यांच्या कुटुंबीयांना रूग्णालयात दाखल केलं आणि माहिती मिळताच  अमिताभ बच्चन यांच्यासह ‘द ग्रेट गॅम्बलर’ची अख्खी टीम रूग्णालयात पोहोचली.  अमजद खान यांच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचे डॉक्टर सांगत होते. त्यासाठी एका हमीपत्रावर कोणी तरी स्वाक्षरी करणे गरजेचं होतं. पण स्वाक्षरी करायला कोणीच तयार नव्हतं आणि स्वाक्षरी झाल्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य नव्हती.  अशावेळी अमिताभ बच्चन पुढे आले. त्यांनी अमजद खान यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि हमीपत्रावर सही केली. लगेच डॉक्टरनी शस्त्रक्रिया सुरु केली. अमजद यांना रक्ताची गरज होती. अमिताभ यांनी रक्तही दिलं. अमजद यांच्यावर तब्बल 12 तास शस्त्रक्रिया चालली. तोपर्यंत अमिताभ रूग्णालयाच्या सोफ्यावर बसून राहिले.  शास्त्रक्रिया यशस्वी झाली, तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला.

 अर्थात अपघातानंतर मात्र अमजद खान यांचं आयुष्यच बदलून गेलं. उपचारादरम्यान अमजद यांना मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्स देण्यात आले होते. यामुळे त्यांचं वजन वाढू लागलं. चित्रपटाच्या ऑफर मिळणं कमी झालं.  27 जुलै 1992 हा दिवस... कुणीतरी भेटायला येणार आहे म्हणून ते तयार होण्यासाठी  आपल्या खोलीत गेले आणि त्याचवेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :अमजद खानअमिताभ बच्चनबॉलिवूड