बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आज आपल्यात नाहीत. वयाच्या 79 व्या वर्षी 4 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 1938 साली आजच्या दिवशी म्हणजे 18 मार्चला त्यांचा जन्म झाला होता. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्यात जन्मास आलेल्या शशी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. शशी कपूर यांच्याबद्दल सर्वांनाच बरेच काही ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विशेषत: त्यांच्या मुलांबद्दल फार कमी लोक जाणतात. आज आम्ही शशी कपूर यांच्या तीन मुलांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
(शशी कपूर- जेनिफर)
शशी कपूरच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही मुले आहेत. 1958 साली शशी कपूर यांनी जेनिफर कँडल या परदेशी युवतीसोबत लग्न केले. त्यावेळी या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. कारण एकतर जेनिफर परदेशी होती. शिवाय दुसºया धर्माची होती. या दाम्पत्याला करण कपूर, कुणाल कपूर व संजना कपूर अशी मुले झाली. आज हे तिघेही काय करतात? शशी यांच्या तिन्ही मुलांनी म्हणजे, करण,कुणाल व संजना यांनी अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावून पाहिले. मात्र कपूर घराण्यातील अन्य सदस्यांप्रमाणे त्यांना यश मिळू शकले नाही.
संजना कपूर
शशी कपूर व जेनिफर यांची लाडकी लेक संजना कपूर ही सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी कपूर घराण्यातील पहिली मुलगी होती. पण तिचे फिल्मी करिअर यशस्वी ठरु शकले नाही. 1981 मध्ये ‘36 चौरंगी लेन’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर उत्सव, हीरो हीरालाल आणि सलाम बॉम्बे या सिनेमांमध्ये संजना दिसली. 1990साली तिने अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वर्षे तिने रंगभूमीवरसुद्धा काम केले आहे.
1993 ते 2012 या काळात संजनाने पृथ्वी थिएटरमध्ये काम केले. 2012मध्ये तिने जुनून नावाने स्वत:ची थिएटर कंपनी स्थापन केली. संजनाचे लग्न प्रसिद्ध टायगर कन्जर्व अॅक्टिविस्ट वाल्मीक थापरसह झाले आहे. दोघांचा एक मुलगा असून हामिर असे त्याचे नाव आहे.
करण कपूर
करणने १९८६ मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातून अभिनेत्री जुही चावला हिनेही डेब्यू केला होता. यानंतर करणचा ‘लोहा’ हा एक अॅक्शन सिनेमा आला होता. या मल्टिस्टारर चित्रपटात करणशिवाय धर्मेन्द्र व शत्रुघ्न सिन्हा होते. पण या दोन चित्रपटानंतरही करण बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. यानंतर करणने आपले प्रोफेशन बदलले. तो फोटोग्राफीकडे वळला. फोटोग्राफीमध्ये त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सध्या करण इंडियाबाहेर असतो आणि कधीमधी भारतात येतो.
करणला बॉम्बे डाइंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. त्याने सुमारे २० वर्षे या जाहिरातीत काम केले. गतवर्षी एका मुलाखतीत करणने त्याच्या फ्लॉप होण्यामागचे कारण सांगितले होते. ‘मला चित्रपटात रूची होती. पण कदाचित माझया लुकमुळे हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांनी मला स्वीकारले नाही. त्याकाळात मी रंगाने खूप भूरा होतो. मला भाषेचीही अडचण होती,’ असे त्याने सांगितले होते. राज कपूर यांच्या निधनानंतर १९८८ मध्ये करण युकेला स्थायिक झाला. यानंतर दरवर्षी डिसेंबरमध्ये तो बॉम्बे डार्इंच्या शूटसाठी मुंबईत यायचा. बॉम्बे डार्इंगची जाहिरात १९८४ मध्ये सुरु झाली होती आणि याचे अखेरची जाहिरात १९९८ मध्ये शूट झाली होती.
कुणाल कपूर
कुणाल कपूर यांचे बॉलिवूड करिअर अगदीच लहान ठरले. १९७८ मध्ये आलेल्या शशी कपूर स्टारर ‘जुनूर’मध्ये कुणालने लहानशी भूमिका केली होती. यानंतर १९८१ मध्ये पद्मिनी कोल्हापुरेसोबत ‘आहिस्ता आहिस्ता’ मधून त्याने डेब्यू केला. हा चित्रपट हिट ठरला. पण कुणालला याचा काहीच फायदा झाला नाही.
यानंतर त्याचे तीन चित्रपट आलेत. अॅक्टिंगनंतर त्याने काही काळ प्रॉडक्शनमध्ये हात आजमावला. पृथ्वी थिएटरचे काम सांभाळले. कुणालने रमेश सिप्पीची मुलगी शीनासोबत लग्न केले. मात्र काही वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.