Join us

Birth Anniversary Special:लक्ष्मीकांत बेर्डेंना असा मिळाला होता 'धुमधडाका' चित्रपट, मानधनाचा आकडा वाचून व्हाल हैराण

By तेजल गावडे | Published: October 26, 2020 12:33 PM

गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती आहे.

गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज ६६वी जयंती आहे. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही घर करून कायम आहेत. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी एकेकाळी मराठी सिनेइंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होती. आजही या दोघांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या दोघांचा किस्सा फार कमी लोकांना माहित आहे. तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्या एका चित्रपटासाठी फक्त एक रुपये मानधन घेतले होते.

हिंदी चित्रपट प्यार किये जाचा मराठीत रिमेक महेश कोठारेंना करायचा होता. सर्व पात्रांची जुळणी झाली पण मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्यांना पात्रच मिळेना. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. झोपी गेलेला जागा झाला नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते. नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड झाली.

महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिले तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका इतकी आवडली की त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. महेश कोठारेंचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यानी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या चित्रपटा संदर्भात चर्चा केली आणि चित्रपटासाठी त्यांचा होकार मिळवला.

महेश कोठारेंनी लगेच खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला. होय त्या फक्त एका रुपयातच त्यांनी हा चित्रपट केला त्या चित्रपटाचे नाव होते धुमधडाका. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे.महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेमहेश भट