संजीव वेलणकर
पुणे, दि. २५ - ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा आज (२५ ऑगस्ट) वाढदिवस.
१९७२ मध्ये संगीतकार म्हणून उदयाला आलेल्या अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेले पहिले गीत ‘नाविका रे’, वारा वाहे रे, हे त्यांचे संगीत दिलेले पहिले गाणे. संगीतात त्यांना सुरवातीपासूनच रुची असल्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांनी फारसे लक्ष पुरवले नाही तसे संगीताचेही त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. लहानवयातच तबला आणि हार्मोनियम वाजवण्यात ते तरबेज झाले. मा.सुधीर फडके यांची त्यांना या क्षेत्रात साथ लाभली. अशोक पत्की यांची बहीण मीना स्वत: गाण्याचे कार्यक्रम करीत असत. त्याच्या सोबत त्यांनी संगीताच्या कार्यक्रमात पदार्पण केले. सुविख्यात संगीत दिग्दर्शक शंकर- जयकिशन, आर. डी. बर्मन यांचेही त्यांना या क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सुविख्यात गायक आणि नाट्यसंगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांच्याशी ओळख झाल्यावर, त्यांचा मदतनीस म्हणून नाटकांना संगीत द्यायला त्यांनी सुरवात केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी अशोक पत्की यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये अधिकृत संगीतकार म्हणून स्थान दिले. बालनाट्यासाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सुविख्यात गायिका सुमन कल्याणपूरकर यांच्याबरोबर त्यांनी भक्तिगीतांचा अल्बम केला. ‘एकदाच यावे सख्या’ या अल्बमसाठीही संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी असंख्य चित्रपटांना दिलेल्या संगीतासाठी काही चित्रपटांचा इथे उल्लेख करता येईल- आम्ही असो लाडके, आलिशा, अंतर्नाद, आनंदाचे झाड, धर्मांगी, बिंधास्त, चिंगी, चिनू, दे टाळी, देबू, धमाल बाबल्या गणप्याची, दुर्गे दुर्घट भारी, एक डाव संसाराचा, एक गाडी बाकी अनाडी, फॉरिनची पाटलीन, गलगले निघाले, गरम मसाला, गुलाम बेगम बादशहा, गोडी गुलाबी, गोष्ट धमाल नाम्याची, हल्लागुल्ला, हेच माझं माहेर, ही पोरगी कुणाची, जमलं रे जमलं, जनता जनार्दन, कथा दोन गणपतरावांची, खबरदार, खुर्चीसम्राट, कीस बाई कीस, कुणासाठी कुणीतरी, लावणी एक तमाशा, मामला पोरीचा, मधुचंद्राची रात, माझा मुलगा, मला एक चान्स हवा, मी सिंधू सपकाळ, मिशन चॅम्पियन, मुंबई आमची, नणंद भावजय, नवसाचा पोर, वन रूम किचन, पैजेचा विडा, प्रेम करू या खुल्लमखुल्ला, राणीने डाव जिंकला, आई शपथ, आई पाहिजे, राजाने वाजवला बाजा, रंगत संगत, रानी और जानी, रेशीमगाठ, सरदारी बेगम, सत्त्वपरीक्षा... अशा असंख्य चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ११५ मराठी चित्रपट, २५0 च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. आभाळमाया, गोट्या, श्रीमान-श्रीमती, वादळवाट अशा टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांची जिंगल्स अतिशय लोकप्रिय झाली आहेत. ‘धारा धारा... शुद्ध धारा, झंडू बाम, झंडू बाम वेदनाहारी बाम ही आणि अशी काही त्यांची जिंगल्स चित्रपटांच्या गाण्यांसारखी आपल्या तोंडची झाली आहेत. राष्ट्रीय एकात्मतेवरचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या ल्युईस बँक्ससोबत केलेल्या, पीयूष पांडे यांची रचना असलेल्या गीताला इतकी प्रसिद्धी मिळाली की, याला अनधिकृत राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली! ‘संचारी गुरुकुल’ अशी एक स्वत:ची संगीतशाळा २०१३ मध्ये त्यांनी पुण्यात काढली आहे. ‘सप्त सूर माझे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
मा.अशोक पत्की यांच्या 'सप्तसूर माझे' हे आत्मचरित्र जीवनाच्या विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या आजच्या नव्या पिढीला ऊर्जा देणारे आहे. मा.अशोक पत्की यांना, संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. नाटकांसाठी नाट्यदर्पण पुरस्कार, प्रियतमा नाटकासाठी १९९६ मध्ये, चार दिवस प्रेमाचे या नाटकासाठी २००७ मध्ये त्यांना प्राप्त झाला. १९९९ मध्ये त्यांना ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकासाठी रंगदर्पण पुरस्कार मिळाला. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांसाठी अर्धांगी, आपली माणसं, सावली अशा काही चित्रपटांना महाराष्ट्र राज्याचा चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. नॅशनल फिल्मसाठी २००६ मध्ये अंतर्नाद, मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटर ऍवॉर्ड, ‘मी सिंधूताई सपकाळ’साठी सूरसिंगार पुरस्कार, ‘गोष्ट धमाल नाम्याची’साठी व्ही. शांताराम पुरस्कार अशा पुरस्कारांनी ते सन्मानित झालेत. त्यांनी संगीत दिलेली ‘आभाळमाया’ ही मालिका विशेष गाजली. अनन्य पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर स्मृतिपुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, शब्दरत्न गौरव पुरस्कार, वसुंधरा पंडित स्मृति पुरस्कार, राम कदम पुरस्कार, झी. टीव्ही पुरस्कार, सह्याद्रीचा नवरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या अशोक पत्की यांची ओ.आर.जी. ही स्वत:ची वेबसाईट आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना प्राप्त झाला आहे.
मा.अशोक पत्की यांना लोकमत समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संदर्भ. डॉ. सुनंदा देशपांडे