Join us

Birthday Special : ऑडिशन घ्यायची तर मुंबईत या...! अमरीश पुरी यांनी हॉलिवूडच्या ‘या’ दिग्गजालाही दिला होता नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 6:30 AM

बॉलिवूडचे प्रसिध्द ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. आज (२२ जून )अमरीश पुरी यांचा वाढदिवस.

ठळक मुद्दे१९७१ मध्ये डायरेक्टर सुखदेवने त्यांना 'रेशमा' आणि 'शेरा'साठी साइन केले. त्यावेळी त्यांचे वय ४० वर्षे होते.

बॉलिवूडचे प्रसिध्द ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील.  आज (२२ जून )अमरीश पुरी यांचा वाढदिवस. २२ जून १९३२ रोजी जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. खरे तर  इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.

अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते.  मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी धरली. अर्थात त्यांनी अ‍ॅक्टिंग सोडली नाही. ते थिएटरकडे वळले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली.   हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हेही अमरीश यांच्या कामाच्या प्रेमात पडले होते.

‘ज्युरॉसिक पार्क’ साख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘इंडियाना जोस अ‍ॅण्ड द टेंपल ऑफ डूम’ या हॉलिवूड चित्रपटात अमरीश यांनी काम केले होते. या चित्रपटात त्यांनी काली मातेच्या भक्ताची निगेटीव्ह भूमिका साकारली होती. पण या चित्रपटासाठी अमरीश यांना राजी करताना खुद्द स्टीव्हन यांनाही बरेच प्रयत्न करावे लागले होते. स्टीव्हन यांनी अमरीश यांनी या चित्रपटाच्या ऑडिशन साठी अमेरिकाला बोलवले होते. पण हॉलिवूडचे बोलवणे आले म्हणून पळत जाणा-यांपैकी अमरीश पुरी नव्हते. ऑडिशन  घ्यायची तर मुंबईत या, असे त्यांनी स्टीव्हन यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. यानंतरही स्टीव्हन यांच्या चित्रपटाबद्दल त्यांनी कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. अखेर   रिचर्ड एटनबरो (रिचर्ड एटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात अमरीश पुरी यांनी काम केले होते.)यांच्या म्हणण्यावरून अमरीश स्टीव्हनसोबत काम करण्यास राजी झाले होते. स्टीव्हन यांचे चित्रपट खास असतात. हा चित्रपट सोडू नकोस, असे रिचर्ड यांनी अमरीश यांना समजावले, तेव्हा कुठे हा चित्रपट करण्यास अमरीश पुरी तयार झालेत.

अमरीश पुरी यांनी इंडस्ट्रीत काम करताना दोन नियम बनवले होते. पहिला म्हणजे ते कधीही कुठल्या मुलाखतीत स्वत:चा आवाज रेकॉर्ड करू देत नव्हते. दुसरा म्हणजे, कव्हर स्टोरीशिवाय ते कुठल्याही मॅगझिनला मुलाखत देत नसत.

 

टॅग्स :अमरिश पुरी