एकेकाळची गाजलेली अभिनेत्री बबीता अर्थात बबीता कपूर यांचा आज (२० एप्रिल) वाढदिवस. २० एप्रिल १९४८ रोजी जन्मलेल्या बबीता आज करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोन यशस्वी अभिनेत्रींची आई आहेत. बबीताकडे आज सगळे काही आहे. पण एकेकाळी याच बबीतांना करिश्मा व करिनाच्या संगोपनासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
बबीता यांचे फिल्मी करिअर फार मोठे नव्हते. पण तरीही बबीता यांनी मोठे नाव कमावले. बबीता हरी शिवदासानी असे त्यांचे पूर्ण नाव. चित्रपटात यशाची एक एक पायरी चढत असताना लोक त्यांना ओळखू लागलेत. पण यशाच्या शिखरावर असताना त्या प्रेमात पडल्या आणि या प्रेमामुळे त्यांच्या फिल्मी करिअरला पूर्णपणे ब्रेक लागला. होय, उमेदीच्या काळात बबीता रणधीर कपूर यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होत्या.
खरे तर लग्नापूर्वी बबीतांची स्वत:ची एक ओळख होती. पण रणधीर कपूरसोबत लग्न केले आणि त्यांना चित्रपटांपासून फारकत घ्यावी लागली. याचे कारण म्हणजे, कपूर घराण्याची सून चित्रपटात काम करू शकत नव्हती. बबीता यांनी कपूर घराण्याचा हा नियम पाळला आणि फिल्मी दुनियेपासून दूर गेल्या.
दुर्दैवाने रणधीर व बबीता यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. यादरम्यान बबीतांनी दोन्ही मुलींना घेऊन रणधीर यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पतीपासून विभक्त झाल्यावर करिश्मा व करिनाची अख्खी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. विशेषत: करिश्माला बॉलिवूडमध्ये आणण्यामागे बबीता यांचे मोठे योगदान राहिले.
बबीता रणधीर यांच्यापासून विभक्त झाल्या असल्या तरी त्यांनी घटस्फोट मात्र घेतला नाही. काही वर्षांनंतर पती-पत्नीच्या नात्यातील कटुताही संपली.
आपल्या लहानशा करिअरमध्ये बबीता यांनी १९ चित्रपटांत काम केले. फर्ज, हसीना मान जाएगी, किस्मत, राज, कल आज और कल असे हिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.