आज अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून ओळखले जाते. पण हे नाव, हा लौकिक एका माणसाची देण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा माणूस कोण तर अभिनेते मेहमूद. अमिताभ यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात मेहमूद यांच्यामुळेच झाली होती. 1969 साली अमिताभ स्ट्रगल करत असताना मेहमूद यांनीच त्यांना ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली होती. आज अमिताभ यांचा वाढदिवस. तेव्हा याच ‘बॉम्बे टू गोवा’च्या सेटवरचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तर ‘बॉम्बे टू गोवा’चे शूटींग सुरु होते. हा सिनेमा मेहमूद यांनी अमिताभ व त्यांचा स्वत:चा भाऊ अनवर अली यांना लॉन्च करण्यासाठी बनवला होता. सगळे काही सुरळीत सुरु होते. एकदिवस अमिताभ सेटवर आले आणि गाणे शूट करायचेय, असे त्यांना सांगण्यात आले. गाणे होते, ‘देखा ना हाय रे सोचा ना’. अमिताभ यांनी या गाण्यावर डान्स करावा, अशी मेहमूद यांची इच्छा होती. अमिताभ यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते इतके घाबरले की, त्यांना दरदरून घाम फुटला. कसेबसे शूटींग सुरु झाले आणि अमिताभ नाचू लागले. पण अमिताभ यांचे एकही पाऊल ठेक्यावर पडत नव्हते. अनेक रिटके झाले. जणू सेटवरचे सगळे आपल्यावर हसत आहेत, असे वाटून अमिताभ शरमेने लाल झालेत. ते थेट त्यांच्या रूममध्ये गेले. मेहमूद त्यांना सगळीकडे शोधू लागलेत. ते रूममध्ये असल्याचे कळल्यावर त्यांनी काही वेळ प्रतीक्षा केली. पण अमिताभ रूमबाहेर येईनात. मग काय, एका क्षणाला मेहमूद संतापले. ते स्वत: रूममध्ये गेलेत. पाहतात काय तर अमिताभ बेडवर लेटलेले होते आणि त्यांना 102 डिग्री ताप भरला होता. पण त्याही अवस्थेत मेहमूद यांना पाहून अमिताभ थरथर कापू लागलेत. मेहमूद आपल्याला नाचवूनच सोडतील, या विचाराने ते इतके अस्वस्थ झालेत की, मेहमूद यांच्यासमोर ढसाढसा रडू लागले. इतकेच नाही तर त्यांनी थेट मेहमूद यांचे पाय पकडले. भाईजान, मुझसे डान्स नहीं हो पाएगा, मुझे नाचना नहीं आता, म्हणून विनवण्या करू लागलेत. पण मेहमूद जराही विचलित झाले नाही.
जो चालू शकतो तो नाचूही शकतो, असे म्हणून तुला नाचावेच लागेल, असे त्यांनी बजावले.पण अमिताभ नाचायला तयार होईनात. अखेर तुला नाचता येते तसे नाच, आपण तसेच शूट करू, असे म्हणून ते रूमबाहेर पडले. बाहेर सेटवर त्यांनी आपल्या टीमलाही याच सूचना दिल्या. अमिताभ नाचतो, तसे नाचू द्या. कोणीही हसणार नाही. उलट टाळ्या वाजवा, असे त्यांनी टीमला सांगितले.
102 ताप असताना अमिताभ अखेर कॅमे-यासमोर डान्स करण्यासाठी उभे झालेत. त्यांचा डान्स पाहून समोरच्यांना हसू आवरेना. पण सगळ्यांनीच कंट्रोल करत, मेहमूद यांनी सांगितल्याप्रमाणे टाळ्या वाजवणे सुरु केले. हा उत्साह बघून अमिताभ यांच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळाली. यानंतर अमिताभ यांनी असा काही डान्स केला की, हे गाणे तुफान हिट झाले. इतकेच नाही अमिताभ यांचा डान्सही लोकांना आवडला.