बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात एक-दोन नाही तर अनेक मोठ्या स्टार्सचा बोलबाला होता. याच काळात मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. स्वत:च्या करिअरलाच नाही तर भारतीय सिनेमालाही त्याने एक नव्या उंचीवर नेले. मुंबईच्या चाळीतला हा छोकरा कोण तर जॅकी श्रॉफ.होय, जॅकी श्रॉफची लाईफ स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. चाळीतल्या या मुलाने इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झालेत.
जॅकी श्रॉफने देव आनंद यांच्या 1982 मध्ये प्रदर्शित ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने. या एका चित्रपटाने जॅकी दादा पे्रक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला.
‘हिरो’ सुपरडुपर ब्लॉकबस्टर झाल्यावर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक जॅकीला साईन करण्यासाठी उत्सुक होते. इतके की, अनेकजण जॅकीच्या घरापर्यंत पोहोचत. अनेक तास ताटकळत. जॅकी पब्लिक टॉयलेटमध्ये असेल तरीही अनेक निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटबाहेर त्याची वाट पाहत बसायचे. कारण जॅकीने आपला चित्रपट करावा, हेच प्रत्येकाचे स्वप्न होते.
‘हिरो’ सुपरडुपर हिट झाल्यानंतरही जॅकी चाळीतच राहत होता. सुपरस्टार बनल्यानंतरही अनेक वर्षे तो चाळीत राहिला. त्याला साईन करण्यासाठी बड्या बड्या निर्माता दिग्दर्शकांनाही चाळीत यावे लागाायचे. विश्वास बसणार नाही, पण जॅकीने त्याच्या अनेक चित्रपटाचे शूटींग चाळीत केले. निर्माता-दिग्दर्शक चाळीत शूट करायला तयार नसायचे. पण जॅकीची डिमांड त्यांना असे करायला भाग पाडायची. आजही जॅकीचे पाय जमिनीवर आहेत, ते याचमुळे.