हृतिक रोशनचा आज वाढदिवस असून अभिनेता राकेश रोशन यांचा तो मुलगा आहे. त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, कहो ना प्यार है हा हृतिकचा पहिला चित्रपट नव्हता. त्याने लहानपणी एका चित्रपटात काम केले होते.
१९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात राकेश रोशन, श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात हृतिकने रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यावेळी हृतिक केवळ १२ वर्षांचा होता. भगवान दादा या चित्रपटातील ‘चुग गई चिड़िया जो खेत फिर पछताओगे’ या गाण्यात बालकलाकार म्हणून हृतिक रोशन ‘डान्सिंग क्वीन’ श्रीदेवी यांच्या सोबत डान्स करताना दिसला होता. हृतिक हा किती चांगला डान्सर आहे हे त्याने आपल्याला पहिल्याच चित्रपटात दाखवून दिले होते.
हृतिक रोशनने कोई मिल गया, क्रिश, काबील, धुम, जोधा अकबर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दिसण्यावर तर मुली फिदा आहेत. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. हृतिकने त्याची बालमैत्रीण सुझान खानसोबत लग्न केले होते. सुझान ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. पण लग्नाच्या काहीच वर्षांत हृतिक आणि सुझानने घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले असून घटस्फोटानंतर ती दोघंही हृतिकसोबत राहातात. हृतिक आणि सुझानला घटस्फोटानंतरदेखील अनेकवेळा मुलांसोबत फिरताना पाहाण्यात येते. त्यांच्यात घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यातली मैत्री आजही टिकून आहे.