आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज (५ ऑगस्ट) काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची लेक काजोलने १९९२ साली ‘बेखुदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खान स्टारर ‘बाजीगर’ या चित्रपटाने. प्यार किया तो डरना क्या, हम आपके दिल में रेहते है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यांसारखे अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. याच हरहुन्नरी अभिनेत्रीबद्दलची एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत.
होय, १९९८ मध्ये काजोल, शाहरूख खान व राणी मुखर्जी यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली होती. हा चित्रपट त्यावर्षी सर्वात मोठा सुपरडुपर हिट ठरला होता. याच चित्रपटाच्या सेटवर काजोलचा अपघात झाला होता आणि यात तिचा स्मृतीभ्रंश झाला होता.
‘कुछ कुछ होता है’च्या ‘ये लडका है दीवाना’ गाण्याचे शूटींग सुरु असताना काजोल सायकलवरून खाली पडली होती. या अपघातानंतर काजोलची स्मृती गेली होती. तिचा स्मृतीभ्रंश झाला होता. तिच्या एका मित्राने याबद्दलचा खुलासा केला होता.
त्यावेळी काजोलला तिचा बॉयफ्रेन्ड अजय देवगण याच्याशिवाय काहीही आठवत नव्हते. मॉरिशसच्या एका हॉटेलच्या खोलीत बसून ती नुसती रडत होती. यानंतर तिचे अजयशी बोलणे करून दिले गेले. तेव्हा कुठे हळूहळू तिला सर्व आठवायला लागले.
अनेक वर्षांनंतर ‘दिलवाले’च्या सेटवरही अशीच घटना घडली होती. या चित्रपटातही शाहरूख हाच तिचा हिरो होता. चित्रपटाच्या सेटवर ती पडली होती. यानंतर काही तासांसाठी तिचा स्मृतीभ्रंश झाला होता. यावेळीही अजय तिच्याशी बोलला आणि मग तिची स्मृती परत आली. शाहरूखने कपिल शर्माच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला होता आणि यावरून काजोलची फिरकीही घेतली होती. काजोल व शाहरूखची मैत्री खूप जुनी आहे. २० वर्षांपासून ते दोघेही मित्र आहे.