आपल्या आवाजाने आणि अभिनयाने संपूर्ण देशाला आजही आपली दखल घ्यायला भाग पाडणारे दिग्गज पार्श्वगायक आणि अभिनेते कुशोर कुमार यांची आज जयंती. आज किशोर कुमार आपल्यात नाहीत पण या हरहुन्नरी कलाकाराला विसरणे शक्य नाही....आज किशोर कुमार यांच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. किस्सा आहे आनंद या यादगार सिनेमा. ‘आनंद’ हा एक यादगार सिनेमा आहे. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या सुपरहिट जोडीच्या अभिनयाने सजलेल्या 70 च्या दशकातील या सुपरहिट सिनेमाच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेत. या चित्रपटाची ऑनस्क्रीन कथा जितकी रंजक आहे तितक्याच या चित्रपटाचे ऑफस्क्रिन किस्सेही रंजक आहेत. होय, एक ऑफस्क्रिन किस्सा म्हणजे, या चित्रपटासाठी सुपरस्टार राजेश खन्ना यांना साईन करण्याआधी मेकर्सच्या डोक्यात एक वेगळेच नाव होते़. होय, ते म्हणजे किशोर कुमार यांचे. पण किशोर कुमार यांच्या हातून हा सिनेमा गेला़ कसा यामागे एक मोठी रंजक कथा आहे.
तर त्यादिवसांत किशोर कुमार एका बंगाली निर्मात्यासोबत एक शो केला होता. पण हा निर्माता पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याचवरून त्यादिवशी किशोर कुमार व त्या बंगाली निर्मात्याचे कडाडून भांडण झाले होते. या भांडणानंतर किशोर कुमार रागारागात घरी परतले आणि घरी परताच आपल्या सिक्युरिटी गार्डला बोलवून कुणीही बंगाली निर्माता आला तर त्याला बाहेरच्या बाहेरून हाकलून लाव, असे फर्मान सोडले.
हा योगायोग म्हणायचा की नियती हे ठाऊक नाही. पण नेमक्या त्याच दिवशी, त्याच क्षणी ऋषीकेश मुखर्जी किशोर कुमार यांना भेटायला पोहोचले. या भेटीचा विषय काय असणार होता तर आनंद हा सिनेमा. पण कुठल्याही बंगालीबाबूला आत सोडायचे नाही, असे खुद्द किशोर कुमार यांचे आदेश होते. मग काय, सिक्युरिटी गार्डने ऋषीकेश मुखर्जी यांना बाहेरच्या बाहेरून रवाना केले. यामुळे ऋषीकेश मुखर्जी प्रचंड नाराज झाले आणि त्याक्षणी आनंद या सिनेमात किशोर कुमार यांना घेण्याचा इरादा त्यांनी सोडून दिला. यानंतर त्यांनी राजेश खन्ना यांना साईन केले.
किशोर कुमार यांना सिक्युरिटी गार्डचा कारनामा कळला, तोपर्यंत निश्चितपणे उशीर झाला होता. त्यांनी सिक्युरिटी गार्डला नोकरीवरून काढून टाकले. अर्थात याने काही फरक पडणार नव्हताच. कारण आनंद हा सिनेमा किशोर कुमार यांच्या हातून कायमचा गेला होता. पुढे राजेश खन्ना यांना घेऊन ऋषीकेश यांनी आनंद हा सिनेमा बनवला. यानंतरचा इतिहास तुम्ही जाणताच...