मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आज ४८वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या सिनेमात काम केले आहे. ‘डॅम्बीस’ या सिनेमाचे पटकथा लेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील मकरंद अनासपुरे यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहे. त्यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे.
मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्हमॅरिज आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटात कामे केली आहेत. २००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा मकरंद आणि शिल्पा यांची भेट झाली. या दरम्यान मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. मग मकरंद यांनी शिल्पा यांना थेट लग्नासाठीच विचारले.
शिल्पा यांचा होकार मिळाल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याविषयी सांगितले. विशेष म्हणजे दोघांचा आंतरजातीय विवाह आहे. पण दोघांच्या घरातून काहीच विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले.
लग्नानंतर शिल्पा यांनी काही सिनेमात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ५ सिनेमात शिल्पा यांनी मकरंद यांच्यासोबत काम केले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहेत. मकरंद आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील मोठा वाटा आहे.
मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव केशव अनासपुरे असून तो नऊ वर्षाचा आहे. तर मुलगी चौदा वर्षांची आहे.